संजीव कुळकर्णी
नांदेड : डॉ.मीनल पाटील खतगावकर आणि श्रीजया अशोक चव्हाण ह्या दोन ‘राज’कन्यांची नावे नांदेड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चेत आहेत. डॉ.मीनल यांचा वाढदिवस २३ मे रोजी साजरा झाला तर श्रीजयाचा वाढदिवस शुक्रवारी आहे.. त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणार्या हितचिंतकांनी मीनल यांचा उल्लेख ‘भावी खासदार’ असा केल्यानंतर श्रीजयाला ‘भावी आमदार’ संबोधत चव्हाण यांच्या हितचिंतकांनी पुढील काळात भोकर मतदारसंघाची सूत्रे नव्या पिढीच्या हाती देण्याचे सूचित केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेनुसार नांदेड जिल्ह्यालाही घराणेशाहीच्या राजकारणाची मोठी परंपरा आहे. शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या समकालीन नेत्यांपैकी अनेकांनी आपल्या मुलांना राजकीय आखाड्यात उतरविले. अलीकडच्या काळात जिल्ह्यातील भाजप खासदाराने ‘मी, माझा मुलगा आणि माझी कन्या’ असा कौटुंबिक राजकीय प्रयोग चालवल्यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या मुलाला बांधकाम व्यवसायात गुंतवून त्याच्या सहचारिणीला, म्हणजे मीनल पाटील यांना २०१७ सालापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आणले.
हेही वाचा… महाविकास आघाडीत दबावतंत्राचा खेळ!
मीनल यांचे राजकीय पदार्पण भाजपच्या माध्यमातून झाले. पहिल्याच निवडणुकीत त्या जि.प.वर निवडून आल्या. त्याचवेळी चिखलीकरांची कन्या, भाजपचे दिवंगत नेते संभाजी पवार यांच्या स्नुषा पूनम ह्याही जि.प.वर निवडून आल्या. अगोदरच्या काळात कुंटूरकरांच्या स्नुषाही जि.प.सभापती झाल्या होत्या. जिल्ह्यातल्या मोठ्या राजकीय कुटुंबातील लेकी-सुना राजकारणामध्ये येत असताना अशोक व अमिता चव्हाण यांच्या दोन जुळ्या कन्या जिल्ह्यातील राजकारण आणि राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून होत्या. या काळात अशोक चव्हाण लोकसभेवर तर अमिता विधानसभेवर होत्या. पण २०१९ नंतर अमिता चव्हाण यांनी निवडणुकीच्या राजकारणातून माघार घेतल्यावर दोन जुळ्या कन्यांपैकी श्रीजया यांच्या राजकीय पदार्पणाची चर्चा चार वर्षांपूर्वी सुरू झाली हाती. त्या चर्चेवर आता हळूहळू शिक्कामोर्तब होऊ लागले आहे.
हेही वाचा… जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने ?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला होता. राजकीय जीवनातील त्यांचा हा दुसरा पराभव होता, पण त्यांच्यासमोर सर्वदृष्टीने दुय्यम असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी हा पराभव केल्यामुळे तो चव्हाण परिवार व हितचिंतकांच्या जिव्हारी घाव घालणारा ठरला. वरील निवडणुकीत चव्हाणांच्या दोन्ही मुलींनी वडिलांचा जीव तोडून प्रचार केला, पण प्रतिस्पर्धी उमेदवार चिखलीकर यांनी कन्या प्रणिता त्यांच्यापेक्षाही सरस ठरली होती. वरील निवडणुकीदरम्यान खतगावकर व त्यांची स्नुषा हे दोघेही भाजपमध्ये होते. पण पुढील काळात त्यांनी अशोक चव्हाणांशी पुन्हा जुळवून घेत घरवापसी केल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात काँग्रेसचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे. त्यातच या पक्षाकडून चव्हाण यांच्या संमतीसह मीनल यांचे नाव लोकसभेच्या उमेदवार म्हणून पुढे आणले जात आहे.
हेही वाचा… चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा तीन तिघाडा काम बिघाडा…
डॉ.मीनल यांना माहेरचीही चांगली राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा बापूसाहेब पाटील एकंबेकर हे कर्नाटक विधानसभेचे आमदार होते. अशा कुटुंबात डॉक्टर झालेली ही मुलगी लग्नानंतर खतगावकर परिवारात आली. काही दिवसांतच येथे रुळली. गेल्या सात-आठ वर्षांत खतगावकरांचे बहुसंख्य सार्वजनिक व्याप आणि वेगवेगळ्या संस्थात्मक जबाबदार्या डॉ.मीनल यांनी आपल्या हाती घेतल्या आहेत. जि.प.सदस्य या नात्यानेही त्यांनी प्रभावीपणे काम केले. खतगावकरांचे समर्थक-कार्यकर्ते यांच्याशीही त्यांनी संवाद राखला. सर्व आघाड्यांवर कटाक्षाने साधेपणा जपला. मुख्य बाब म्हणजे आपल्या कृतीतून, वक्तव्यातून किंवा वर्तनातून कोणताही राजकीय वाद निर्माण होणार नाही, याची खबरदारीही त्यांनी घेतली.
हेही वाचा… कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी
खतगावकरांच्या स्नुषेच्या तुलनेत चव्हाणांच्या दोन्ही कन्यांना विशेषतः राजकीय पर्दापण करू पाहणार्या श्रीजयाने आपली स्वतंत्र ओळख किंवा प्रतिमा अद्याप निर्माण केलेली नाही. त्यांची जडणघडण आणि विधी शाखेतील उच्च शिक्षण मुंबईसारख्या महानगरात झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नांदेडच्या वास्तव्यात सातत्य आले आहे. दोन्ही बहिणी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय झाल्या आहेत. श्रीजयाने भोकर मतदारसंघाच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये लक्ष घातल्याचे दिसते. चव्हाण यांच्यासाठी काम करणार्या ‘सोशल मीडिया’च्या चमूशी त्यांचा संवाद होत असतो. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे फलक पहिल्यांदाच दिसत आहेत. त्यावर भावी आमदार असा उल्लेख ठळकपणे करण्यात आला आहे.
गतवर्षी खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर शंकरनगरच्या कॅम्पमधील नियोजनात डॉ.मीनल यांचा कृतिशील सहभाग दिसून आला. या यात्रेदरम्यान श्रीजया आणि सुजया या दोन्ही भगिनीही सक्रिय होत्या. राहुल यांच्याशी त्यांनी संवाद साधत यात्रेदरम्यान ठिकठिकाणाहून आलेल्या माध्यम प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले होते.