संतोष प्रधान
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना आणि तमिळनाडूत अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यातील राजकारणात प्रादेशिक पक्ष म्हणून महत्त्वाची कामगिरी बजाविली. शिवसेनेच्या तुलनेत अण्णा द्रमुकची पाळेमुळे अधिक घट्ट रोवलेली. योगायोगाने हे दोन प्रादेशिक पक्ष एकाच वेळी फुटीच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठा दणका दिला आहेच, तमिळनाडूत पनीरसेल्वम किती नुकसान करतात यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.
महाराष्ट्र आणि तमिळनाडूत साधारणपणे एकाच वेळी प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला बहर आला. शिवसेना १९६६ मध्ये स्थापन झाली. दक्षिण भारतीयांच्या विरोधातील ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ या घोषणेने शिवसेनेने मुंबई, ठाण्यात मराठी माणसाला आपलेसे केले. तमिळनाडूत अण्णा दुराई यांनी १९४९ मध्ये द्रमुकची स्थापना केली असली तरी पक्षाला १९६७ मध्ये पहिल्यांदा सत्ता मिळाली. शिवसेना स्थापन झाली तेव्हा तमिळनाडूत प्रादेशिक पक्ष सत्तेत आला होता. शिवसेनेला राज्याची सत्ता मिळाली ती १९९५ मध्ये. ती पण स्वबळावर नाही तर भाजपच्या मदतीने. आताही २०१९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठबळावर. शिवसेनेला राज्याची सत्ता स्वबळावर आतापर्यंत तरी मिळू शकलेली नाही. याउलट तमिळनाडूत १९६७ पासून द्रमुक किंवा अण्णा द्रमुक हे दोन्ही प्रादेशिक पक्ष स्वबळावर सत्तेत आले आहेत.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू असतानाच तिकडे तमिळनाडूत अण्णा द्रमुक हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. द्रमुकमध्ये अण्णा दुराई यांच्या पश्चात पक्षात नेतृत्वाचा वाद सुरू झाला. करुणानिधी आणि प्रसिद्ध तमिळ अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांच्यातील वाद वाढत गेला. शेवटी १९७२ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांनी अण्णा द्रमुकची स्थापना केली. तेव्हापासून तमिळनाडूचे राजकारण हे द्रमुक वा अण्णा द्रमुक अशा दोन प्रादेशिक पक्षांभोवती केंद्रित झाले. मुख्यमंत्रीपदावरून करुणानिधी आणि रामचंद्रन यांच्यात स्पर्धा असायची. १९८७ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वाचा वाद झाला. रामचंद्रन यांची पत्नी जानकी आणि जयललिता या दोघांनी पक्षावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. या वादात पक्षाची सारे सूत्रे जयललिता यांनी ताब्यात घेतली. अण्णा द्रमुक पक्षावर जयललिता यांनी पकड बसवली. डिसेंबर २०१६ त्यांच्या मृत्यूपर्यंत जयललिता म्हणजेच अम्मा यांना पक्षात कोणीही आव्हान देऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्यात संघर्ष सुरू झाला. आधी जयललिता यांची मैत्रीण शशिकला यांनी पक्षाचे नेतृत्व तसेच मुख्यमंत्रीपद पटकविण्याचा प्रयत्न केला. पण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांना चार वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांच्या साऱ्याच मनसुब्यांवर पाणी फिरले.
अण्णा द्रमुकमधील संघर्ष कमालीचा टोकाला गेला. चारच दिवसांपूर्वी पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळविण्यासाठी पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम गटात हिंसक संघर्ष झाला. शेवटी सरकारी यंत्रणेने मुख्यालयाला टाळे ठोकले होते. पलानीस्वामी यांनी पक्षाची सारी सूत्रे हाती घेतली. तमिळनाडूतील कोईम्बतूर, सालेम, तिरपूर, नम्मकल आदी पश्चिम पट्ट्यात अण्णा द्रमुकचे प्राबल्य आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला तरीही पश्चिम पट्ट्यात पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या. पलानीस्वामी याच भागातील. पलानीस्वामी यांची पक्षाच्या हंगामी सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाची सूत्रे हाती येताच पलानीस्वामी यांनी आपले स्पर्धक पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्याबरोबर त्यांच्या समर्थकांना बाहरेचा रस्ता दाखविला. पनीरसेल्वम हे आता अण्णा द्रमुकमध्ये फूट पाडतील अशी चिन्हे आहेत. शशिकला यांच्याबरोबर जमवून घेत अण्णा द्रमुकवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करणे किंवा भाजपमध्ये प्रवेश करणे हे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत.
शिवसेनेत एकनाथ शिंदे हे संघटनात्मक पातळीवर किती नुकसान करतात आणि तिकडे अण्णा द्रमुकमध्ये पनीरसेल्वम अण्णा द्रमुकला किती धक्का देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. शिवसेना काय किंवा अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यांमध्ये ताकद निर्माण केली. प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांना जनमानसाचा कौल मिळाला. अण्णा द्रमुकला करुणानिधी यांच्या द्रमुक या दुसऱ्या प्रादेशिक पक्षाचे आव्हान होते किंवा स्पर्धा असायची. मनसे स्थापन होईपर्यंत शिवसेनेला राज्यात अन्य प्रादेशिक पक्षाचे आव्हान नव्हते. योगायोगाने हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आज फुटीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण कायम राहते की बदलते याची जशी उत्सुकता आहे तसेच एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांचा वारसा पलानीस्वामी चालवणार की पनीरसेल्वम याचीही उत्सुकता असेल.
एक आजी आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांसाठी राजकीय कौशल्याची लढाई
शिवसेनेत बंड केल्यावर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. तमिळनाडूत पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम या दोन माजी मुख्यमंत्र्यांसाठीही अस्तित्वाची लढाई आहे. शिंदे हे शिवसेनेचे किती नुकसान करतात यावर त्यांचे सारे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. यासाठी त्यांना राजकीय कौशल्य पणाला लावावे लागेल. दुसरीकडे तमिळनाडूतही पलानीस्वामी यांच्यासमोर अण्णा द्रमुकवर पूर्णपणे पकड निर्माण करण्याचे आव्हान असेल.