छत्रपती संभाजीनगर : हिंदूत्त्वाच्या राजकारणात ‘ आक्रमक ’ कोण असा खेळ छत्रपती संभाजीनगरमध्ये मांडला जात असून यात आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आघाडीवर राहण्याची भूमिका स्वीकारली आहे.समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी रा. स्व. संघाच्या भूमिकेस डावलून औरंजेबाची कबर उखडून टाकण्याची भूमिका मांडली होती. आता त्यात त्यांनी भर टाकली असून खुलताबादचे नाव रत्नपूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
खुलताबादमध्येच औरंगजेबाची कबर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात नामांतराचा खेळ तसा जुना. ज्या गावांची अंत्याक्षरे बाद अशी आहेत, त्या सर्व गावांची नावे बदलण्याची भूमिका घेतली असल्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट म्हणाले. ‘औरंगजेब’ संदर्भहीन असल्याचे रा. स्व. संघाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर भाजपचे नेते या प्रकरणावर आता फारसे बोलत नाहीत.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटास मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात ‘ हिदूत्त्वा’ च्या नव्या भूमिका मांडण्याची कसरत करावी लागते. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटास मुस्लिम मतदारांनी पसंती दिली होती. मात्र, उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे पूर्वीसारखी ‘ हिरवा साप’ ‘ रझाकाराची औलाद’ असे शब्द उद्धव ठाकरे गटाचे नेते आता जाहीर कार्यक्रमांमध्ये वापरत नाहीत. मात्र, राम नवमीच्या शुभेच्छा, पाडव्या दिवशीची हिंदू जनजागृती यात्रांमधून ‘ आम्ही हिंदूंत्त्व सोडले नाही’ असा संदेश द्यावा लागतो. नुकतेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अशी यात्रा काढली तर अंबादास दानवे यांनी शहरातील प्रमुख चौकात शुभेच्छांचे संदेश फलकावर लावले.

शिवसेना एकनाथ शिंदे यांचे समर्थकांमधील संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे ही नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना ‘ हिंदूत्त्वा’ वरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. औरंगजेबाच्या कबरीवरुन आणि आता खुलताबादचे नाव रत्नपूर करावे या मागणीसाठीही पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटास डिवचले आहे. भाजपचे नेते मात्र, या सगळ्या आरोप -प्रत्यारोपातून दूर आहेत.

शहरात १५ दिवसाला एकदा पाणी येते आहे, पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू आहे. दररोज न्यायालयातून फटकार मिळत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील नेत्यांमध्ये हिंदूत्त्वावरुन आक्रमक कोण यावरुन स्पर्धा लागली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान संजय शिरसाट हे गेल्या १५ दिवसापासून सातत्याने एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच अधिक आक्रमक असल्याचे संदेश आपल्या वक्तव्यातून देत आहेत.