नवी दिल्ली : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची येथे भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर ही बैठक झाली.
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ठाकरे यांच्याबरोबर त्यांची पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही होते. ठाकरे यांनी कपिल सिब्बल यांचीही येथे भेट घेतली. गुरुवारी संध्याकाळी उशिरा राजधानीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर ठाकरे मुंबईत परतले.
हेही वाचा >>> कारण राजकारण : घटत्या मताधिक्याची भरत गोगावलेंना चिंता
सुनीता केजरीवाल यांना आश्वासन
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. बैठकीला आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि राघव चढ्ढा देखील उपस्थित होते. उद्धव यांनी सुनीता केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले की, ‘या कठीण काळात सर्वजण त्यांच्याबरोबर आहेत.’
उपराष्ट्रपतींशी संवाद
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्लीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी झालेल्या भेटीवेळी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे गेले तीन दिवस दिल्लीत आहेत. उपराष्ट्रपतींनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.