अहिल्यानगरः लोकसभा निवडणुकीतील एक व विधानसभा निवडणुकीतील १० अशा एकूण ११ पराभूत उमेदवारांनी निवडणुकीतील मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात मात्र आता केवळ एकच उमेदवार पडताळणीच्या रिंगणात राहिला आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेले दावे व पडताळणी प्रक्रियेतून घेतलेली माघार, यामुळे केवळ नेवासा मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) पराभूत उमेदवार शंकरराव गडाख यांच्या अर्जानुसार मतदान यंत्राची पडताळणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ही पडताळणी २१, २२ व २४ फेब्रुवारीला अहिल्यानगर शहराजवळील एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात केली जाणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अहिल्यानगर मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी तसेच विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात (काँग्रेस, संगमनेर), प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी-शरद पवार), प्रभावती घोगरे (काँग्रेस, शिर्डी), अभिषेक कळमकर (अहिल्यानगर, राष्ट्रवादी-शरद पवार), संदीप वर्पे (राष्ट्रवादी-शरद पवार, कोपरगाव), राम शिंदे (भाजप, कर्जत-जामखेड), प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी-शरद पवार), राणी नीलेश लंके (पारनेर, राष्ट्रवादी-शरद पवार) राहुल जगताप (श्रीगोंदे- राष्ट्रवादी-शरद पवार) व शंकरराव गडाख (शिवसेना-ठाकरे) या १० जणांनी मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केले होते,
मात्र यातील सुजय विखे, राम शिंदे, राणी लंके व प्रताप ढाकणे या चौघांनी निवडणूक निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयातही याचिका दाखल केलेली आहे. निवडणूक आयोगाने याचिका दाखल असणाऱ्यांची, पडताळणीची मागणी न्यायालयाच्या परवानगीनंतरच केली जाईल, त्यासाठी त्यांनी न्यायालयाची परवानगी आणावी, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चौघांच्या मागणीनुसार होणारी पडताळणी आता न्यायालयाच्या परवानगी नंतरच होईल.
तर इतर पराभूतांपैकी बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, प्रभावती घोगरे, अभिषेक कळमकर, राहूल जगताप व संदीप वर्पे यांनी पडताळणीच्या प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यांनी पडताळणीसाठी भरलेले शुल्कही त्यांना परत मिळणार आहे. मतदान यंत्र पडताळणीसाठी प्रति यंत्र ४७ हजार २०० रु. (जीएसटीसह) शुल्क या पराभूत उमेदवारांनी जमा केले होते.
त्यामुळे मतदान यंत्र पडताळणीची मागणी करणाऱ्यांपैकी केवळ शंकराव गडाख हेच मागणीच्या रिंगणात राहिले आहेत. त्यांची पडताळणी २१, २२ व २४ फेब्रुवारी रोजी होईल. त्यांनी नेवासा मतदारसंघातील सोनई, धनगरवाडी, मोरेचिंचोली, बुऱ्हाणपूर, सांगवी व माका या सहा केंद्रांवरील १० मतदान यंत्र पडताळणीची मागणी केली आहे.
मतदान यंत्र पडताळणीची मागणी करणाऱ्यांना अजूनही आपली मागणी रद्द करता येणार आहे. ज्या दिवशी पडताळणी केली जाईल, त्याच्या तीन दिवस आधी ही माघार घेता येणार आहे. शिवाय त्यांनी भरलेले शुल्कही परत केले जाणार आहे. राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक शाखा, अहिल्यानगर.