मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नाही, म्हणून ते आपल्या गावी विश्रांतीसाठी गेले आहेत. मुख्यमंत्री लवकरच परत येतील. ६० आमदारांचा शिंदे यांना पाठिंबा असून, त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. यासंदर्भातील निर्णय शिंदे लवकरच घेतील, असे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामंत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना पूर्णपणे एकनाथ शिंदे यांची कल्पना होती. या योजनेच्या यशस्वीतेसाठी शिंदे हे सरकारमध्ये राहणे आवश्यक आहे. आमची सर्वांची इच्छा आहे की शिंदे हे सरकारमध्ये असले पाहिजेत. महायुतीच्या रणनीतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची दोन दिवसांत बैठक होणार आहे. त्यामध्ये मंत्रीमंडळासंदर्भात सविस्तर चर्चा होईल. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी गुरुवारी दिल्लीत चर्चा केली आहे. नव्या सरकारमध्ये मिळणाऱ्या खात्यांसंदर्भात शिवसेनेच्या काही मागण्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्या भाजप नेतृत्वासमोर ठेवल्या. सर्व मुद्यावर चर्चा झाली आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल, याचा निर्णय भाजप नेतृत्व घेईल. राज्यातल्या नव्या सरकारचा लवकरच शपथविधी होईल, असेही सामंत म्हणाले.

हेही वाचा >>>Sambhal Violence : संभल हिंसाचार प्रकरणी योगी सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत; पुन्हा चौकाचौकात लागणार आंदोलनकर्त्यांचे पोस्टर्स?

मतदान यंत्रावर खापर फोडणे अयोग्य’

मतपत्रिकांवर मतदान घेण्यासंदर्भात महाविकास आघाडीने केलेल्या मागणीची उदय सामंत यांनी जोरदार खिल्ली उडवली. प्रत्येक निवडणुकीत दुपारनंतर मतदान अधिक होत असते. झारखंड विधानसभेला या प्रकारे मतदान झालेले आहे. तिथे भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे मतदान यंत्रावर आपल्या पराभवाचे खापर फोडणे योग्य नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant claim regarding eknath shinde deputy chief minister post print politics news amy