सतीश कामत
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असतानाच, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपले बंधू किरण सामंत निवडणुकीत उतरले तर साडेतीन लाख मतांनी विजयी करु, असे सांगून एक प्रकारे त्यांच्या उमेदवारीचे सूतोवाच केले आहे. सामंत यांनी अप्रत्यक्षपणे कोकणातील भाजप नेते नारायण राणे यांनाच आव्हान दिले आहे.
या संदर्भात किरण सामंत यांच्याशी संपर्क साधला असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेजण काय निर्णय घेतील, त्यावर हा विषय अवलंबून राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपली निवडणूक लढवण्याची तयारी आहे का, असे विचारले असता, याबाबत आपण अजून काहीही निर्णय घेतलेला नाही, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला. मात्र विषय स्पष्टपणे फेटाळूनही लावला नाही.
आणखी वाचा-रस्त्यांसाठी रविंद्र चव्हाणांची कोकणी साद
पालकमंत्री सामंत शुक्रवारपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चिपळूण येथे त्यांनी विविध योजनांची आढावा बैठक घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीवरुन छेडले असता ते म्हणाले की, किरण सामंत माझे मोठे बंधू आहेत. त्यामुळे त्यांनी कोणता राजकीय निर्णय घ्यावा हा त्यांचा निर्णय आहे. पण त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी मिळाली तर शिवसेना पक्ष म्हणून त्यांना साडेतीन लाखाच्या मताधिक्याने विजयी करू.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत २०१४ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना सामंत बंधुंची साथ होती. पण राज्यात गेल्या वर्षी झालेल्या सत्तांतरामध्ये सामंत मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर गेल्याने या तिघांमध्ये राजकीय वितुष्ट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीतील सामंत बंधुंच्या राजकीय डावपेचांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
आणखी वाचा-२०२४ च्या प्रचारासाठी भाजपाकडून ‘इस्रो’चा वापर; महुआ मोईत्रांची पंतप्रधान मोदींवर टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट सत्तेत सहभागी झाला आहे. शिवाय, भाजपा व आरपीआय आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत आमचे तीन नेते एकत्र बसतील व एकत्रित निर्णय घेतील, तो सर्वाना मान्य असेल. आमच्या नेत्यांना महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती, त्या ठिकाणची राजकीय ताकद आणि स्थितीची पूर्ण कल्पना आहे, अशीही टिप्पणी सामंत यांनी केली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी आतापर्यंत तीन वेळा निवडणूक लढविली आहे. यापैकी एकदा २००९ मध्ये काँग्रेस पक्षातून ते निवडून आले होते. तर दोनदा पराभूत झाले. उदय सामंत यांनी शिवसेनेचा खासदार असल्याने या मतदारसंघावर शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा असल्याचे अधोरेखित केले. कोकणातील या जागेवर भावाला उमेदवारी देण्याचे सुतोवाच करीत राणे यांच्या प्रभाव क्षेत्रात त्यांना आव्हानच दिले आहे.