सनातन धर्माचे मलेरिया, ड्येंगू, करोना किंवा अन्य रोगांप्रमाणे उच्चाटन झाले पाहिजे, असे विधान करून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. एरव्ही छोट्या – मोठ्या नेत्यांकडे दुर्लक्ष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उदयनिधी यांच्या वक्तव्याची दखल घेत त्याला प्रत्युत्तर देण्याची सूचना भाजपच्या मंत्र्यांना केली. गेल्याच आठवड्यात मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत भाजपशी एकजुटीने सामना करण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी भाजप व मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. मोदी सरकारच्या काळात भारताची पिछेहाट झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दोनच दिवसांत स्टॅलिन पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्मावरून केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला. इंडिया आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपने मग स्टॅलिन पुत्राच्या विधानाचा उपयोग करून घेतला. काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाली. कारण सनातन धर्माला विरोध करावा तर हिंदू विरोधी असा रंग भाजप देणार. यामुळेच हा विषय अधिक चिघळत ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न राहिल अशीच चिन्हे दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपसह सर्वच पक्षांना दखल घ्यावी लागली ते उदयनिधी स्टॅलिन एवढे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहेत का किंवा त्यांचे राजकारणातील स्थान काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनिधी यांचा शिरच्छेद करणाऱयाला दहा कोटींचे बक्षीस देण्याचे अयोध्येतील एका धर्मगुरुने जाहीर केले. तर अन्य एका संस्थेने त्यांना मारहाण केल्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर केले. अल्पावधीतच उदयनिधी स्टॅलिन राष्ट्रीय पातळीवर एकदमच प्रकाशात आले.

आणखी वाचा-भाजपच्या ४० टक्क्यांहून अधिक जागा धोक्यात? सर्वेक्षणातील निष्कर्षांमुळे चिंता वाढली

द्रमुकचे सर्वेसर्वा व तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे नातू. द्रमुकमध्ये घराणेशाहीलाच अधिक महत्त्व. करुणानिधी यांचे भाचे मुरसोली मारन हे केंद्रीय मंत्री तसेच दिल्लीतील पक्षाचा चेहरा म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे पुत्र दयानिधी मारन हे माजी केंद्रीय मंत्री असून, सध्या द्रमुकचे खासदार आहेत. पुत्र स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत. करुणानिधी यांची कन्या कानीमोझी या खासदार आहेत. दुसरे पुत्र अलागिरी हे केंद्रात मंत्री होते. घराणेशाहीचा हा वारसा आता तिसऱया पिढीत आला आहे. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी हे आधी आमदार झाले व गेल्याच वर्षी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.

४५ वर्षीय उदयनिधी हे मुळचे चित्रपट क्षेत्रातील. चित्रपट अभिनेते, वितरक, निर्माते असा त्यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास. अभिनयाच्या त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. उत्कृष्ट अभिनेत्याचा त्यांना पुरस्कारही मिळाला होता. करुणानिधी कुटुंबात राजकारणातील घराणेशाहीतूनच उदयनिधी यांचा राजकारण प्रवेश झाला. द्रमुकच्या युवक आघाडीचे नेते म्हणून त्यांचा राजकारणातील प्रवास सुरू झाला. द्रमुकचा उगवता तारा म्हणून त्यांना संबोधण्यात येत असे. २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना आजोबा करुणानिधी यांनी मागे प्रतिनिधीत्व केलेल्या व चेन्नईतील पक्षासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱया चेपॉक मतदारसंघातून उमेदवारी दिली. द्रमुकच्या लाटेत उदयनिधी निवडून आले. द्रमुकची सत्ता आल्यावर उदयनिधी यांना लगेचच मंत्रिपदी निवड करण्यात आली नाही. गेल्या वर्षी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. उदयनिधी यांच्या समर्थकांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जातो.

आणखी वाचा- रशियाबाबत मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेला विरोधकांचा पाठिंबा; राहुल गांधींचे परदेशातून समर्थन

द्रमुकचे राजकारण हे नेहमीच जातीभेदाच्या विरोधात राहिले आहे. हिंदी विरोधी भूमिकेबरोबरच द्रविडी संस्कृतीवरच करुणानिधी यांचा त्यांच्या सहा दशकांच्या राजकारणावर भर राहिला. सनातन धर्माच्या विरोधात उदयनिधी यांनी मतप्रदर्शन केल्याने द्रविडी संस्कृतीचा आदर करणाऱया तमिळनाडूतील एका वर्गाकडून त्याचे स्वागत होऊ शकते. कदाचित द्रमुकला त्याचा राजकीय लाभही होईल. पण इंडिया आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपने उदयनिधी यांच्या विधानाला जास्तच महत्त्व दिलेले दिसते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanidhi stalin leader who came into limelight in a short period of time print politics news mrj