तमिळनाडूचे मंत्री व द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मंगळवारी (२६ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडी आणि द्रविड मुन्नेत्र कळघमविरोधात केलेल्या एका वक्तव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला घरी परत पाठविल्याशिवाय त्यांचा पक्ष झोपणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?

तिरुवनमलाई जिल्ह्यातील प्रचारसभेला संबोधित करताना ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी म्हणतात द्रमुकला झोप येत नाही. होय, जोपर्यंत आम्ही तुम्हाला घरी पाठवीत नाही तोपर्यंत आमची झोप उडाली आहे. भाजपाला घरी परत पाठविल्याशिवाय आम्ही झोपणार नाही. २०१४ मध्ये गॅस सिलिंडर ४५० रुपये होता आणि आता तो १२०० रुपये झाला आहे. निवडणूक जवळ येत असल्याने पंतप्रधान मोदींनी नाटक सुरू केले आहे आणि १०० रुपये कमी केले आहेत. निवडणुकीनंतर ते पुन्हा सिलिंडरच्या किमती ५०० रुपयांनी वाढवतील,” असे वृत्त ‘एएनआय’ने दिले.

पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

“काँग्रेस आणि त्यांच्या ‘घमंडिया’ आघाडीला (इंडिया आघाडी) या विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याने त्रास झाला आहे. या विकास प्रकल्पांमुळे त्यांची झोप उडाली आहे. विकासावर बोलण्याची ताकद काँग्रेसकडे नाही. जेव्हा मी विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतो, तेव्हा ते त्याला ‘चुनावी रणनीती’ (निवडणूक रणनीती) म्हणतात. केवळ नकारात्मकता हेच काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे,” असे पंतप्रधानांनी ११ मार्चला विकास प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सांगितले होते.

पंतप्रधान मोदींनी मिचौंग चक्रीवादळादरम्यान तमिळनाडूला भेट दिली नाही : उदयनिधी

उदयनिधी यांनी पंतप्रधानांवर एकामागोमाग एक आरोप केले. उदयनिधी म्हणाले की, गेल्या वर्षी राज्याला मिचौंग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता, तेव्हा मोदींनी तमिळनाडूला भेट दिली नव्हती. “आमच्या मुख्यमंत्र्यांनी तमिळनाडूतील चक्रीवादळासाठी केंद्राकडे निधीची मागणी केली होती; परंतु आजपर्यंत आम्हाला एक रुपयाही दिलेला नाही. येत्या २२ दिवसांत आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना आश्वस्त करतील आणि द्रमुकला विजयी करण्याचे आवाहन करतील. आपण सर्वांनी द्रमुकला विजयी करावे,” असे ते पुढे म्हणाले. उदयनिधी म्हणाले, “३ जूनला एम. करुणानिधी (दिवंगत राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री) यांची १०० वी जयंती आहे. ४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे. आम्ही तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील सर्व ४० जागा जिंकू,” असे स्टॅलिन पुढे म्हणाले.

हेही वाचा : काँग्रेसमधून भाजपात येताच मिळालं लोकसभेचं तिकीट; कोण आहेत नवीन जिंदाल?

उदयनिधी स्टॅलिन कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. तमिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी केंद्र सरकारच्या असमान निधीवाटपावर टीका केली होती. आम्ही पंतप्रधान मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणू, अशा खोचक शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. भाजपा सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरही टीका करीत ते म्हणाले होते की, हे धोरण तमिळनाडूमधील मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करील.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udaynidhi stalin on prime minister narendra modi rac