जळगाव – विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची (उद्धव ठाकरे) अवस्था गलितगात्र झाल्यासारखी झाली आहे. दोन्ही जिल्हाप्रमुखांची निवडणूक काळात हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सध्या ठाकरे गट जिल्हाप्रमुखाविना आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरले असून अस्वस्थतता आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जागा वाटपाच्या सुत्रानुसार शिवसेना ठाकरे गटाला जळगाव शहराची जागा सोडल्यानंतर माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यामुळे नाराज झालेले माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून जयश्री महाजन यांच्या विरोधात बंडखोरी केली. परिणामी, ठाकरे गटाकडून त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात आली होती. महाजन यांना महापौर बनविण्यात पाटील यांचे मोठे योगदान होते.
हेही वाचा >>> अदाणी समूहाला मोठा धक्का, तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरची निविदा रद्द का केली?
भाजपच्या २७ नगरसेवकांना फोडून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अशाच प्रकारे जळगावमध्ये पक्षाच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारकार्यात भाग न घेता पक्षशिस्त मोडली म्हणून जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची निवडणुकीच्या आदल्या दिवशी पक्षश्रेष्ठींनी हकालपट्टी केली होती. याशिवाय एरंडोलमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार डॉ.सतीश पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केली म्हणून पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांचीही ठाकरे गटाने हकालपट्टी केली होती. माजी उपमहापौर राहिलेले कुलभूषण पाटील, माजी महापौर राहिलेले विष्णू भंगाळे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले डॉ.हर्षल माने, या तिघांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्यापासून त्यांचे समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा गट पक्षापासून लांब गेला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी वेगळी भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांची इतर पक्षांनीही हकालपट्टी केली होती. परंतु, निकालानंतर काही पक्षांनी त्यांना पुन्हा पक्षात घेतले असताना जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाकडून तशा कोणत्याच हालचाली अजूनही झालेल्या नाहीत. त्याचा मोठा फटका जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला बसला आहे.
हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यातील मविआ नेते राजकीय विजनवासात
२०२१ मध्ये महापौर, उपमहापौर निवडणुकीवेळी भाजपच्या २७ नगरसेवकांना फोडून शिवसेनेने जळगाव महापालिकेवर भगवा झेंडा फडकावला होता. त्यामुळे जळगाव शहरात शिवसेनेचा चांगला दबदबा निर्माण झाला होता. मात्र, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते कारवाईनंतर दुरावल्याने आता ठाकरे गटाचे पक्ष संघटन पार खिळखिळे झाले आहे. यावर्षी महापालिका निवडणूक होण्याची शक्यता असताना, जिल्हाप्रमुखांची नव्याने नियुक्ती करण्यातही ठाकरे गटाकडून कालापव्यय करण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये कमालीची मरगळ आली आहे.
शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) जळगावमधील नवीन जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. मात्र, त्यासंदर्भात अद्याप काहीच ठरलेले नाही. – संजय सावंत (संपर्क प्रमुख, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, जळगाव)