सुहास सरदेशमुख/ सौरभ कुलश्रेष्ठ
औरंगाबाद : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मराठी अस्त्राला निकामी करण्यासाठी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुंबईतील मराठी टक्का घसरल्याबद्दल दोषी ठरवण्याची आणि त्यातून मुंबईतील मराठी मतदारांमध्ये शिवसेनेला खलनायक ठरवण्याची खेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळली आहे. मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ मराठी टक्का या मुद्दयाचे रिंगण आता पुन्हा आखले जात आहे असून लालबाग, परळ, भांडुपसह मुंबईतील मराठी माणसाचा टक्का का घसरला याचे विश्लेषण ‘सामना’मधील रोखठोक सदरातून करावे असे आव्हान त्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना दिले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट पैठणमधील सभेत उमटले. आपल्यावरील टीकेला उत्तर देण्याबरोबरच मुंबईशी निगडीत विविध आरोप करत उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात कैद करून त्यांना राजकीय आक्रमणाची संधी द्यायची नाही आणि त्यासाठी शिवसेना व मुंबईतील मराठी माणूस या भावनिक नात्यावरच हल्ला चढवत ते नाते तोडायचे अशी रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखली आहे. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या समर्थकांवर साबणाचा बुडबुडा अशी टीका शिवसेनेकडून केली जात होती. मात्र, याच साबणाने धुलाई केल्याचा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
हेही वाचा : शेती स्वावलंबन मिशन’चे अध्यक्षपद टिकविण्यासाठी किशोर तिवारींची धडपड
मराठी माणूस हा मुंबईत शिवसेनेच्या प्राधान्याचा मुद्दा असतो आणि निवडणुकीच्या तोंडावर मुंबई-मराठी माणूस आणि शिवसेना या त्रिकोणी नात्याचा उच्चार करत ठाकरे कुटुंब मराठी मतदारांना भावनिक साद घालते. ठाकरे यांच्या हाकेला ओ देत मराठी मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहतात असे वारंवार दिसून आले आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत हे समीकरण निष्प्रभ करण्याचे आव्हान भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे.
हेही वाचा : साताऱ्यात शिवसेनेची पडझड सुरूच; उद्धव ठाकरेंपुढे नव्याने संघटन बांधणीचे आव्हान
त्यासाठीच आता एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मराठी टक्का घसरल्याचे अपश्रेय उद्धव ठाकरे यांना देऊन त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणुकांपुरतेच त्यांना मराठी- मराठी करता येते. पण मराठी माणसाचा विकास केला असता तर तो मुंबईबाहेर गेला नसता, असे विधान एकनाथ शिंदे यांनी त्या दृष्टीनेच केले.मराठी माणसांचा टक्का शिंदे गटाच्या बाजूला जाणार की उद्धव ठाकरे मुंबईतील मराठी मतांवरील प्रभाव राखणार याची निर्णायक लढाई आता सुरू झाली आहे.