Uddhav Thackeray and Raj Thackeray News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्रित येतील, अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकारणात सतत जागती ठेवली जाते. दोन्ही नेत्यांचे नातेवाईक, त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नेहमीच याबाबत सूचक विधानं करीत असतात. मात्र, आता पहिल्यांदाच राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनसे प्रमुखांनी मनसे-शिवसेना युतीबाबत सकारात्मक वक्तव्य केलं. तर उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या वक्तव्यावर तत्काळ प्रतिसाद दिला. दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या संभाव्य पुनर्मिलनावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत कोण काय म्हणालं? हे जाणून घेऊ…

मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची शक्यता आहे, असा प्रश्न माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना “दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काहीही वाईट वाटण्याचं कारण नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. “मला असं वाटतं की माध्यमं यावर जरा जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट पाहा, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू. ऑफर देणारे, त्यावर प्रतिसाद देणारे आणि अटी ठेवणारेही तेच आहेत. त्यावर मी काय बोलणार? याबाबत मला जास्त विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं पाहिजे,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांनी मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत काय म्हटलं?

राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वत: काम करतात. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी हा प्रश्न त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही यावं? हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षांने सांगण्याचं काही कारण नाही. माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आपल्या सद्द्विवेक बुद्धीला स्मरून योग्य निर्णय घ्यावा,” असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा : Maharashtra Politics : शिवसेना-मनसे युती खरंच शक्य? दोन्ही पक्षांसमोर कोणत्या अडचणी?

उद्धव-राज एकत्र येण्यावर विचारताच शिंदे पत्रकारांवर चिडले

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, ते पत्रकारांवरच चिडले. ‘अरे काही तरी कामाच्या गोष्टी करा रे, ते जाऊ द्या’ असा त्रागा व्यक्त करत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. त्यामुळे यावेळी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केले. दुसरीकडे, राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यास उद्धव ठाकरे तयार होणार नाहीत. कारण, त्यात त्यांचा इगो आडवा येईल, असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला.

राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार असतील, तर त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन पक्ष काय भूमिका घेतील, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, काँग्रेसने या हालचालींचं स्वागत केलं आहे. “आम्ही काँग्रेसवाले म्हणजेच भारत जोडोवाले आहोत, दोन कुटुंब एकत्र असतील तर त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही,” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. भाजपा महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. भाजपा व महायुती महाराष्ट्राच्या मुळावर उठली आहे असा त्यांचा (शिवसेना-मनसे) इशारा असल्याची दाट शक्यता आहे, असंही सपकाळ म्हणाले.

राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबत राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक सूचक ट्वीट केलं. “मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं. दरम्यान, रोहित पवार यांनी या ट्विटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साद घातली आहे का? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही आम्हाला प्रिय आहेत. आज एकत्र आहेत ही चांगली बाब आहे. आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला सोनेरी दिवस आहे.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा : तमिळनाडूत स्टॅलिन यांच्यासमोर मोठं आव्हान? भाजपाला सापडली सत्तेची चावी?

राज ठाकरे एकत्र येण्याबाबत काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी अभिनेते व सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना राज म्हणाले, “कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले (उद्धव ठाकरे-राज ठाकरे) वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत, महाराष्ट्र फार मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं- एकत्र राहाणं यात फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. परंतु हा विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे आपण पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा,” असं राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे. जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आडवं जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही. त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही. हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान, मनसे-शिवसेना युतीची चर्चा सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.