मुंबई: शिवसेना ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या ६५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्ष शेकापने दावा केलेल्या १२ जागांवर उमेदवार जाहीर करून कुरघोडी केली आहे. सांगोला, रामटेक, अकोला पूर्व, वणी, निफाड, गेवराई, लोहा, भूम परांडा, सोलापूर दक्षिण, पाटण, ऐरोली आणि नाशिक मध्य असे हे १२ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले. आघाडीत तेढ निर्माण होण्यास हे मतदारसंघ कारणीभूत ठरत आहेत.
कधीकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघात शेकापचे बाबासाहेब देशमुख इच्छुक होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापला ही जागा देशमुख यांच्यासाठी हवी होती. शिवसेना ठाकरे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून आयात केलेल्या दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करून टाकली. शेकापवर अशा प्रकारची कुरघोडी लोहा मतदारसंघातही करण्यात आली आहे. या मतदारसंघात सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे शेकापच्या तिकिटावर विजयी झाले होते. साहजिकच ते या निवडणुकीत शेकाप़कडून इच्छुक होते. त्यांच्या या इच्छेचा विचार न करता त्यांच्या जागी २०१४ मध्ये भोसरी मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढलेल्या एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रामटेक मतदारसंघातील वाद चिघळला
शिवसेना ठाकरे पक्षाने या मतदारसंघात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राजेंद्र मुळक यांना डावलून थेट विशाल बरबटे यांची उमेदवारी जाहीर केली. अकोला पूर्व मतदारसंघात गोपाल दातकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी पूजा काळे व कपिल ढोके या काँग्रेसच्या उमेदवारांनी दावा केला होता. वणी मतदारसंघात संजय दरेकर या नवख्या उमेदवाराला शिवसेना ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या ठिकाणी काँग्रेसचे वामनराव कासावर हे गेली अनेक वर्ष इच्छुक उमेदवार आहेत.
हेही वाचा >>> उमेदवारीसाठी जरांगे यांच्याकडे गर्दी
माजी आमदार राहिलेल्या दिलीप बनकर यांच्या निफाड मतदारसंघात अनिल कदम यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. बनकर हे दोन्ही राष्ट्रवादीमधून उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवून होते. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने ते शरद पवार गटाकडून प्रयत्न करीत होते. गेवराई मतदारसंघात बदामराव पंडित यांचे नाव जाहीर झाले आहे. भूम परांडा मतदारसंघाच्या बदल्यात हा मतदारसंघ ठाकरे लढवणार होते, पण राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेता शिवसेना ठाकरे यांनी गेवराई व भूम परांडा (राहुल पाटील) या दोन्ही मतदारसंघात उमेदवार जाहीर करून टाकले. सोलापूर दक्षिण मतदारसंघासाठी अमर पाटील उमेदवार आहेत. काँग्रेसचे दिलीप माने या मतदारसंघात गेली अनेक वर्षे शड्डू ठोकून आहेत. पाटण मतदारसंघ म्हणजे पक्षांची लढाई नसून देसाई – पाटणकर कुटुंबाची लढाई मानली जाते. शिवसेना फुटीनंतर शिवसेना शिंदे पक्षाचे नेते झालेल्या शंभूराजे देसाई यांना हरविणे हे शिवसेना ठाकरे यांचे लक्ष्य आहे. या मतदारसंघातील सत्यजीत पाटणकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याकडून लढण्यास तयार होते. ते मशाल हाती घेण्यास तयार नाहीत.
शिवडीतून अखेर अजय चौधरी यांनाच उमेदवारी
मुंबई: शिवसेनेकडून (ठाकरे) विद्यामान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी अपवाद विधानसभेतील गटनेते अजय चौधरी यांचा होता. पण निवडून येण्याची क्षमता या निकषावर चौधरी यांच्या नावावर गुरुवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला असलेल्या शिवडी मतदारसंघातून ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी उमेदवारीसाठी आग्रही होते. यामुळे अजय चौधरी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. गुरुवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर अजय चौधरी यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. निष्ठेला प्राधान्य देत उद्धव ठाकरे यांच्याकडून विद्यामान आमदार अजय चौधरी यांनाच उमेदवारीचा एबी फॉर्म देण्यात आला.
वडाळ्यात माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी
शिवसेनेकडून (ठाकरे) जाहीर करण्यात आलेल्या ६५ उमेदवारांच्या यादीव्यतिरिक्त माजी महापौर श्रद्धा जाधव यांची उमेदवारी वडाळा मतदारसंघातून निश्चित करण्यात आली. वडाळ्यात भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात श्रद्धा जाधव निवडणूक लढवणार असून त्यांना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे.
मुंबई, रामटेकच्या जागेसाठी काँग्रेसचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह
महाविकास आघाडीकडून ८५-८५-८५ चे सूत्र ठरविण्यात आले असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत अनेक जागांची अदलाबदल करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत (ठाकरे) चर्चा सुरू आहे. मुंबईतील भायखळा, वांद्रे पश्चिम आणि वर्सोवा मतदारसंघ तसेच विदर्भातील रामटेक मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही असून या मतदारसंघांचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड तसेच काँग्रेस नेते सुनील केदार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.