सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव, भाजपचे विखारी हिंदुत्व, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सत्तेसाठी महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान आणि शिवसेना नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास दयामाया न दाखवता पळता भुई थोडी करण्याचा गर्भित इशारा या शनिवारच्या जाहीर सभेतील विधानांमधून आतापर्यंत विरोधकांचे हल्ले थोपवणारी शिवसेना राजकीय युद्धासाठी मैदानात उतरून विरोधकांवर आक्रमकपणे तुटून पडणार असा संदेश मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि विरोधकांमध्ये मोठा राजकीय संघर्ष उफाळून येणार असे चित्र आहे.

आक्रमक भूमिकेचा शिवसैनिकांना संदेश

गेल्या काही काळापासून हिंदुत्व, मुंबई महापालिका आणि शिवसेना नेत्यांवरील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया यांचे हत्यार करून विरोधकांनी शिवसेनेवर हल्ला चढवण्याची रणनीती अवलंबिली होती. विरोधकांचे एकतर्फी आणि सातत्यपूर्ण हल्ले व ते रोखणारी शिवसेना असे चित्र तयार होत होते. त्यातून ठाकरे कुटुंबावरील आणि शिवसेनेवरील भाजपचे हल्ले वाढत गेल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. शिवसैनिकांना संघर्ष आवडतो आणि तो सुरू झाला की त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारतो असे मानले जाते. शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी याच गोष्टीचा वापर केला. आतापर्यंत शिवसेनेवर एकापाठोपाठ एक हल्ले करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या `मुंबईला स्वतंत्र करण्याच्या’ विधानाचा राजकीय अन्वयार्थ हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आहे हे अधोरेखित करताना कधी तिखट शब्द वापरत तर कधी शेलक्या शब्दांत ठाकरे यांनी समाचार घेतला. केंद्राच्या आशीर्वादाने महाराष्ट्र भाजपमधील सर्वोच्च व अत्यंत ताकदवान असलेल्या फडणवीस यांच्याबद्दल आता संयमी नाही तर आक्रमक भूमिकेचा संदेश शिवसैनिकांना दिला आहे.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यावर उद्धव ठाकरे अनेकदा बोलले होते. पण या जाहीर सभेत खोटे गुन्हे दाखल केल्यास महाराष्ट्रात दयामाया दाखवणार नाही, पळता भुई थोडी करू हा इशारा देत प्रतिहल्ल्याचे संकेत दिले. किरिट सोमय्या, राणा दाम्पत्य, मनसे यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर त्यांची कशी पळापळ झाली हेही ठाकरे यांनी त्यातून सूचित करत लढाईसाठी शिवसैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या लोकांच्या बडबडीकडे लक्ष दिल्यास एकाग्रता भंग पावेल. त्यापेक्षा शिवसेनेची, सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित करत नेमके काय काम करायचे आहे याचा संदेश ठाकरे यांनी दिला. सभेच्या निमित्ताने झालेल्या मोठ्या गर्दीस हिंदुमहासागर संबोधणे हा शक्तीप्रदर्शनाचा भाग होता. मुंबईवरील मराठी ठसा हा मुद्दाच शिवसेनेच्या जन्माचे व प्रभावाचे कारण आहे. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आणून शिवसेना आपली सत्ता राखते.

मराठी मतांमध्ये तिहेरी विभागणी

यंदाच्या निवडणुकीत उत्तर भारतीय व गुजराती मतदारांच्या आधारे व मराठी मतांमध्ये शिवसेना-भाजप-मनसे अशी तिहेरी विभागणी करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करण्याचे समीकरण भाजपने मांडले आहे. त्याला उत्तर म्हणून पुन्हा एकदा मुंबई तोडण्याचा डाव, मुंबई मराठी माणसाचीच आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि चूल पेटवणारे हिंदुत्व या मांडणीच्या आधारे मुंबईतील मराठी मतदारांना एक करून भाजपशी लढण्याची मांडणी ठाकरे यांनी केली. भाजप व संघाच्या हिंदुत्वाने काय दिले, काश्मीरमधील पंडित असुरक्षित असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदुत्वारक्षणाच्या क्षमतेवर उपस्थित केलेले प्रश्न हे भाजपचे हिंदुत्व हे केवळ राजकीय सोयीसाठी असल्याचे जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न होता.

राजकीय युद्धासाठी शिवसेना मैदानात

आजारपणामुळे उद्धव ठाकरे आता घरातच असतात हा संदेश देऊन त्यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या आक्रमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची खेळी भाजपने खेळली होती. शनिवारच्या जाहीर सभेतून मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पुन्हा मैदानात उतरल्याचा व आक्रमक झाल्याचा संदेश शिवसैनिकांना व त्यांच्या मतदारांना दिला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे हिंदुत्व चूल पेटवणारे व भाजपचे दंगल पेटवणारे अशी मांडणी करत करोनाच्या आर्थिक संकटानंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामान्यांच्या मनातील आर्थिक स्थैर्याच्या भावनेवर बोट ठेवले.

Story img Loader