उमाकांत देशपांडे
मुंबई : भ्रष्टाचार, घराणेशाही आणि आयाराम संस्कृतीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला लक्ष्य करीत दुटप्पीपणा उघड केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना भाजप त्यात खोडा घालत असल्याचा आरोप करीत आणि केंद्राकडे घटनात्मक तरतुदीची मागणी करीत ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाकरे व अन्य शिवसेना नेत्यांनी दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व भाजपला लक्ष्य केले. मोदींसह भाजप नेते हे गांधी व ठाकरे घराणेशाहीवर नेहमी टीका करतात. त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे यांनी मला घराण्याचा अभिमान असल्याचे सांगून कुटुंबसंस्कृती न मानणाऱ्या आणि मागेपुढे कोणी नसणाऱ्यांचा भरवसा काय, असा मुद्दा मांडत मोदी राजवटीची तुलना मुसोलिनी, हिटलर, स्टँलिन, पुतीन यांच्या जुलमी राजवटीशी केली. पाशवी बहुमताच्या सरकारपेक्षा डगमगती खुर्ची असणारे इतरांच्या सहकार्याने चालणारे सरकार केंद्रात हवे, असे आवाहन करून ठाकरे यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण केली. ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव यांनी घराणेशाहीवर बोलताना ज्येष्ठ भाजप नेते राजनाथ सिंह, अमित शहा, वसुंधराराजे शिंदे, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, विजयकुमार गावीत आदी नेत्यांची मुले राजकारणात असून भाजपने त्यांना आमदार-खासदार केल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आणि राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराचा आरोप खुद्द मोदी यांनी करूनही त्यांना भाजपने बरोबर घेऊन उपमुख्यमंत्री ही केले.
हेही वाचा… भाजपच्या मोर्चेबांधणीमुळे रायगडमध्ये तटकरे अस्वस्थ
मंत्री दादा भुसे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, प्रताप सरनाईक आदी नेते शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना भ्रष्टाचारी आणि भाजपबरोबर गेल्यावर शुद्ध व स्वच्छ कसे, या दुटप्पीपणावरही ठाकरे व अन्य नेत्यांनी टीका केली. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक घराण्यांनी पक्षासाठी त्याग व कष्ट केले. त्यांना मात्र उपऱ्यांसाठी सतरंज्या उचलाव्या लागत असल्याची टीका करून ठाकरे यांनी निष्ठावंत भाजप ने त्यांच्या भावना बोलून दाखविल्या. सर्वात मोठा पक्ष असताना भाजपला अन्य पक्षातील नेते का लागतात, असा मार्मिक सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. पुढील काळात ठाकरे गट या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा… ऊसदराचे राजकारण पेटले; पश्चिम महाराष्ट्रातील हंगामावर आंदोलनाची पडछाया
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून केंद्र सरकारने आता संसदेत कायदादुरूस्ती करून आरक्षण द्यावे, धनगरांच्या आरक्षणाचाही प्रश्न सोडवावा, अशा मागण्या करून ठाकरे यांनी केंद्रालाही वादात ओढले आहे. महाराष्ट्रातील संवेदनाशील प्रश्नात केंद्र सरकार मौन पाळून असल्याने संसदेत कायदा करण्याची मागणी करून ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचार, घराणेशाही, आयाराम संस्कृती, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवरून ठाकरे गट व महाविकास आघाडी भाजपला घेरणार असल्याची चुणूकच ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात दिसून आली.