मुंबई : लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला घाम फोडला. आता विधानसभा निवडणुकीत उरलीसुरली गुर्मी उतरविणार आहोत. राजकारणात एक तर तू राहशील, नाही तर मी राहीन, असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना आव्हान दिले.ठाकरे गटाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक रंगशारदा सभागृहात पार पडली. ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.सरकार पाडण्याची सुपारी घेऊन, आता दिल्लीश्वरांचे बूट चाटण्याचे काम काही जण करीत असल्याची टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.
‘मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीस यांनी अनेक डाव खेळले. सर्व काही सहन करून मी आज तडफेने उभा आहे. कधीकाळी माझ्या बरोबर असलेले घरावर चालून आले आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असा आरोप ठाकरे यांनी केला’.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वापरलेल्या भाषेतून आपली मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, असे खणखणीत प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. राज्यात सर्वधर्मीय नागरिक एकत्रितपणे राहात असताना जातीधर्माचे राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या विभाजनवादी भाषेवर आमचा आक्षेप असून भाजप त्यांच्या ‘आरे च्या भाषेला कारे’ ने सडेतोड उत्तर देईल, असा इशारा दिला.