मुंबई : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही न्यायमंदिराची दारे ठोठावत आहोत. हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही, अशी खंत व्यक्त करताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता जनतेच्या दरबारातील लढाई सुरू झाली असून त्या दरबारात न्याय मागणार असल्याचे सांगत महायुती सरकारवर टीका केली. राज्यात भ्रष्टाचार, महिला अत्याचार होत असून जनतेला त्राता उरला नसल्याने ‘मशाल हाती घे, सत्वर भू वरी ये’ या अराजकीय गाण्यातून आई जगदंबेला आम्ही साकडे घालत असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले.
हेही वाचा >>> Campaigning Ends In Haryana : हरियाणात निवडणूक प्रचाराची सांगता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या आणि नंदेश उमप यांनी गायलेल्या ‘असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, सत्वर भू वरी ये गं सत्वर भूवरी ये’, या गीताचे अनावरण करण्यात आले.
दसरा मेळाव्यात आरोपांना उत्तर!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, सध्या आमच्या विरोधात जे कोणी बोलत आहेत त्यांना बोलू द्यात. या सगळ्याचा फडशा मी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यात पाडणारच असून ‘सो सोनार की, एक लोहार की’ असा दणका देणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.