सांंगली : महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत गुरुवारी कडेगावमध्ये झालेल्या मेळाव्याकडे महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने पाठ फिरवली. लोकसभा निवडणुकीवेळी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी अपक्ष विशाल पाटील यांची केलेली पाठराखण आणि शिवसेनेचे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील यांचा मानहानिकारक झालेला पराभव हे या मागील प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.
पतंगराव कदम यांचा पुतळा अनावरण आणि स्मृतिस्थळ लोकार्पण सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील काँग्रेससह आघाडीतील अनेक मातब्बर नेत्यांना आमदार डॉ. कदम यांनी आमंत्रित केले होते. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य घटक पक्षांचे नेते, पदाधिकारीही या कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून ते अगदी सांगली स्थानिक पातळीवरील नेत्यांची या मेळाव्यातील अनुपस्थिती ही आज कार्यक्रमस्थळी चर्चेचा विषय झाली होती.
हेही वाचा – Lalbaugcha Raja : सोन्याचा मुकूट, आकर्षक पितांबर अन्…; लालबागच्या राजाचा शाही थाट पाहा!
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आल्याचे आमदार डॉ. कदम यांनी आठ दिवसांपूर्वी माध्यमांशी चर्चा करताना सांगितले होते. मात्र निमंत्रणपत्रिकेवर ठाकरे यांचे नाव नसल्याने त्याच वेळी त्यांच्या अनुपस्थितीची आणि त्यामागच्या राजकीय धाग्यांची चर्चा सुरू झाली होती. आज शिवसेनेने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे या चर्चेने जोर धरला.
लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेनेला मिळाली होती. मात्र या जागेसाठी डॉ. कदम अखेरपर्यंत आग्रही राहिले. पण अखेर यामध्ये ठाकरे गटाची सरशी झाली आणि त्यांच्या वतीने पहिलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. या निर्णयानंतरही सांगलीतील काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रचारात डॉ. कदम जाहीरपणे दिसले नसले तरी त्यांच्या मतदारसंघामध्ये विशाल पाटलांना मिळालेले मताधिक्य आणि विजयानंतर जल्लोषात त्यांचा मध्यवर्ती असलेला सहभाग बरेच काही सांगून जाणारा होता.
सांगली लोकसभेच्या या निवडणुकीनंतर राज्य पातळीवर काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट एकत्र असले तरी सांगलीत मात्र या दोन्ही पक्ष, त्यांच्या नेत्यांमध्ये उघडपणे फूट पडली आहे. याचाच परिणाम म्हणून आजच्या डॉ. कदम यांच्या कार्यक्रमाकडे ठाकरे यांच्यापासून ते अगदी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.
आजच्या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित असताना ठाकरे गटाचा हा बहिष्कार ठळकपणे दिसून येत होता. उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु ते किंवा आदित्य ठाकरे, संजय राऊत, पक्षाचे संपर्कनेते भास्कर जाधव यांच्यापैकी कुणीही कार्यक्रमास आले नाही. पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतच स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. याबाबत पक्षाचे स्थानिक पदाधिकारी नाराजीमागे निमंत्रणपत्रिकेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र नसल्याचे कारण देत असले तरी खासगीत लोकसभा निवडणुकीचे शल्य व्यक्त करत आहेत.
आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मला वैयक्तिक संपर्क साधून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. तथापि, विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्यात येत आहे. अशावेळी आमच्या पक्षाचे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र निमंत्रणपत्रिकेवर नव्हते. यामुळे कार्यक्रमास जाणे आम्हाला उचित वाटले नाही. – संजय विभुते, जिल्हाप्रमुख शिवसेना