लोकसभा निवडणुकीत चारपैकी तीन जागा जिंकल्यापाठोपाठ विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांतही विजय संपादन केल्याने मुंबईवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब हे विजयी झाले. त्यांनी भाजपचे किरण शेलार यांचा २६ हजार मतांनी पराभव केला. मुंबई पदवीधर हा गेली ३० वर्षे शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ कायम राखण्यात ठाकरे गटाला यश आले. मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर विजयी झाले. पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा जिंकून ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे.

हेही वाचा – सदाभाऊ खोत यांचे राजकीय पुनर्वसन

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील चार जागा शिवसेना ठाकरे गटाने लढविल्या होत्या. त्यापैकी तीन जागा जिंकल्या तर वायव्य मुंबईची जागा अवघ्या ४८ मतांनी गमावली. यापाठोपाठ मुंबई पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातही ठाकरे गटाने विजय मिळविला. लोकसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने विजयाची पताका कायम ठेवली आहे. या दोन लागोपाठ विजयांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटात फूट पाडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. ३० ते ३५ माजी नगरसेवक गळाला लावले. काही नेतेही बरोबर गेले. पण सामान्य शिवसैनिक तसेच शिवसेनेचे पारंपरिक मतदार हे अजूनही ठाकरे यांच्याबरोबरच असल्याचे निकालांवरून सिद्ध होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे वायकर यांना निसटता विजय मिळाला. पण उर्वरित दोन उमेदवारांचा पराभव झाला. मुंबई शिक्षकमध्ये शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात होता. पण तेथेही शिंदे गटाची डाळ शिजू शकली नाही. यावरून मुंबईत शिंदे गटाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.

हेही वाचा – एकेकाळी दलितांसाठी आशा ठरलेल्या बसपाचा ‘या’ कारणांमुळे जाणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाची सारी मदार ही मुंबई, ठाणे, कोकणावरच अधिक आहे. मुंबईतील ३६ पैकी २० ते २२ जागा महाविकास आघाडीत लढविण्यासाठी मिळाव्यात, असा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे तीन खासदार निवडून आले आहेत. तिन्ही मतदारसंघांत ठाकरे गटाच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. तसेच शिवसेनेच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत अधिक यश मिळविण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असेल.

लोकसभेपाठापोठ पदवीधर मतदारसंघात भाजपला मुंबईत आपले वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. ईशान्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन्ही मतदारसंघ कायम राखण्यात भाजपला अपयश आले. त्यातच ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने सहापैकी चार जागा जिंकल्याने भाजपला मोठा धक्का बसला. पदवीधरमध्ये भाजपने ताकद लावली होती. पण तेथेही अपेक्षित यश मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपला रणनीती बदलावी लागेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group continued to dominate mumbai print politics news ssb
First published on: 02-07-2024 at 09:50 IST