अहिल्यानगर : विधानसभेच्या निवडणुकीनंतर अहिल्यानगर शहरातील शिवसेनेच्या ठाकरे गटाला लागलेल्या गळतीचा वेग पाहता हा पक्ष शहरातून नामशेष होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे गटाला लागोपाठ दुसऱ्यांदा मोठे खिंडार पडले. त्यातून शहरप्रमुखासह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, शाखाप्रमुख, कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची रांग लावली आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला पुरेसे उमेदवार तरी उपलब्ध होऊ शकतील की नाही, याची चर्चा आताच सुरु झाली आहे.
खरेतर अहिल्यानगर शहर पूर्वी एकत्रित शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. शहरावर शिवसेनेने दीर्घकाळ वर्चस्व ठेवले. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्यांतच ठाकरे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरे गट सोडून शिवसेनेत प्रवेश होत आहे तो आगामी महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा हा परिणामही मानला जातो. जिल्ह्यात आता ठाकरे गटाला कोणी नेता उरलेला नाही. त्यामुळे तो सोडून जाण्याचा प्रश्न नाही. परंतु नगरसेवक, पदाधिकारी, तळाचे कार्यकर्तेही पक्ष सोडू लागले आहेत. त्यांना थोपवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी शहरात धाव घेतली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. उलट दानवे यांच्यावरच लोकसभा निवडणुकीत कसा अन्याय झाला हे सांगत त्यांना आपल्याबरोबर शिंदे गटात येण्याचा प्रस्तावच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठेवला होता. गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या तब्बल ४० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
एकत्रित शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी शहरावर दीर्घकाळ राज्य केले. नगरपालिका असताना आणि नंतर महापालिका झाल्यानंतरही शिवसेना दीर्घकाळ सत्तेत होती. मात्र राठोड यांच्या निधनानंतर जिल्ह्यात शिवसेनेला एकत्रित बांधून ठेवेल असा नेताच राहिलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रिपद मिळवले. मात्र जिल्ह्यात त्याचा पक्षाला काहीच उपयोग होऊ शकला नाही. यंदा तर त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या वेळीच शिवसेनेचा एकही आमदार जिल्ह्यात विजयी होऊ शकला नाही. फुटीनंतर ठाकरे गटाची ही परिस्थिती यंदाही कायम राहिली तर शिंदे गटाचे भाजपकडून आयात केलेले दोन उमेदवार विजयी झालेले आहेत.
पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचा प्रामुख्याने रोष आहे तो खासदार संजय राऊत यांच्याबद्दल. विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्याची जबाबदारी राऊत यांच्यावरच सोपवण्यात आली होती. दगाबाजी करून अहिल्यानगर शहराची जागा सोडण्यात आल्याचा जाहीर आरोपच राऊत यांच्यावर करण्यात आले. त्याची खदखद वेळोवेळी प्रकट झाली. मात्र, पक्षाने त्याची दखल घेतली नाही. बेदखल झालेले पदाधिकारी आता पक्ष सोडू लागले आहेत.
शिवसेनेत फूट पडली, त्यावेळी काही मोजक्याच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हाच पक्षाला गळती लागेल असे चिन्ह दिसत होते. मात्र त्याचीही दखल घेतली गेली नाही. शिंदे गटाला शहरात अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही असाही दावा त्यावेळी ठाकरे गटाकडून केला जात होता. एकनाथ शिंदे यांच्यावर निवडणुकीत टीका करणारेही आता पक्षप्रवेश करू लागले आहेत. अलीकडच्या काळात महिना-दीड महिन्यापूर्वी मोठा गट पक्ष सोडून जाणार असल्याची चाहूल लागली होती. त्याचीही दखल घेतली गेली नाही. उद्योगमंत्री उदय सामंत अहिल्यानगर शहराच्या दौऱ्यावर आल्यानंतर मोठे खिंडार पडले. आता उर्वरित माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचे प्रथम प्राधान्य आहे ते शिंदे गटातील प्रवेशाला. काही अपवादात्मक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याची चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणूक काही महिने पुढे गेली असली तरी चार नगरसेवकांची प्रभाग रचना असेल असे गृहीत धरून प्रभागनिहाय पॅनलची निर्मिती डोळ्यासमोर ठेवून हे प्रवेश घडत आहेत. ठाकरे गटाचे वरिष्ठ हतबलतेने ही परिस्थिती पाहत आहेत.