माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्या संघटनेत प्रवेश देऊन कोकणात बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणातील रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वर्षीच्या फुटीपूर्वी या जिल्ह्यात शिवसेनेचा एक छत्री अंमल होता. येथील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा इत्यादींवर या पक्षाचं वर्चस्व होतं. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा हे तिन्ही पक्ष, काही विशिष्ट भाग वगळता, जिल्ह्यात प्रभावी नाहीत. त्याचा फायदा उचलून शिवसेनेने वाड्या-वस्त्यांपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं. पण गेल्या वर्षी जून महिन्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार-खासदारांचा मोठा गट बाहेर पडला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या चार आमदारांपैकी विद्यमान पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम हे दोघेजण शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माजी मंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण हेही या दिंडीत सहभागी झाले आहेत. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना खूपच मर्यादा आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार शेखर निकम यांनी संगमेश्वर-चिपळूण टापूमध्ये चांगलं बस्तान बसवलं आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात आक्रमक एकांडा शिलेदार, अशी प्रतिमा असलेले ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव वगळता ठाकरे गटाकडे सक्षम, अनुभवी नेतृत्व राहिलेलं नाही. अशा परिस्थितीत संघटनेची पुनर्बांधणी करत असताना कोकणच्या उत्तर भागात त्यांना शिवसेना शैलीतल्या आक्रमक नेत्याची गरज होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी संजय कदम यांचा प्रवेश झाला आहे.

हेही वाचा – ठाकरे गटाकडून सांगलीत विधानसभा विजयाचे लक्ष्य, मात्र संघटना बांधणीचे काय?

रविवारी झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांच्या भाषणात फार वेगळे मुद्दे नव्हते. पण पडझडीनंतर या निमित्ताने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांचं प्रथमच झालेलं आगमन सामान्य कार्यकर्त्यांच्या दृष्टीने निश्चितच उत्साहवर्धक होतं. राजापूर – रत्नागिरीपासून दापोली-मंडणगडापर्यंत निरनिराळ्या भागातले प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या निमित्ताने एकवटले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा मागे लागलेले आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांची व्यासपीठावरील उपस्थितीही इतरांचं मनोधैर्य वाढवणारी होती. मेळाव्याच्या निमित्ताने माजी आमदार कदम यांनी सकाळपासूनच खेड शहरात उत्तम वातावरण निर्मिती केली. संपूर्ण शहर भगवामय करण्याबरोबरच संध्याकाळच्या सभेपूर्वी शहरातून काढलेली रॅली लक्षवेधी होती. इतर राजकीय मिरवणुकांपेक्षा या रॅलीचे वेगळेपण म्हणजे भगवे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांबरोबरच उंट, घोडे आणि लोककला पथकही सहभागी झालं होतं.

ठाकरे यांचं सभास्थानी आगमन होण्यापूर्वी अपेक्षेनुसार आमदार जाधव आणि शिवसेनेच्या रणरागिणी सुषमा अंधारे यांची नेहमीच्या आक्रमक शैलीत भाषणं झाली. विशेषतः आमदार जाधव यांनी काही वेळा त्यांचे परंपरागत राजकीय विरोधक माजी मंत्री रामदास कदम यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्ला चढवला. सभेला आलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांना जोश आणण्यासाठी तो उपयुक्त ठरला.

हेही वाचा – Atiq Ahmed: चार दशकांत गुन्हेगारीची १०० प्रकरणे, १४४ गुंडांची टोळी; अतिक अहमद आता योगी सरकारला का घाबरतोय?

अशाच प्रकारे राज्याच्या अन्य भागातही उद्धव ठाकरे मेळावे घेणार आहेत. त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या शिवगर्जना यात्रेला राज्याच्या विविध भागांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशामुळे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना लढण्यासाठी आत्मविश्वास आला आहे. तसेही रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे नेते समोरच्या तंबूत दाखल झाले असले तरी कार्यकर्ते संघटनेशी बऱ्यापैकी निष्ठावान राहिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. ठाकरे यांची सभा त्या दृष्टीने कोकणातील सैनिकांना संघटित करण्यासाठी उपयुक्त ठरली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray in public meeting in ratnagiri district gave former ncp mla sanjay kadam entry in his group print politics news ssb