छत्रपती संभाजीनगर : मुस्लिम आरक्षण, तीन तलाक, समान नागरी कायदा, राम मंदिर, वीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्याची कर्नाटक सरकारची तयारी यावरून आपली भूमिका स्पष्ट करावी, असे विचारत गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांचा ११ वेळा भाषणात उल्लेख केला.
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याविषयी निर्माण झालेली सहानुभूती, हिंदू मतांमध्ये होणारे संभाव्य विभाजन गृहीत धरून उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘हिंदुत्वा’चा मुद्दा काढून घेण्यासाठी भाजपने केलेली ही रणनीती असल्याचे मानले जात आहे. ‘नरेंद्र मोदी ॲट द रेट नाईन’ या तंत्रस्नेही लघुरुपाचे घोषवाक्य करून भाजपने आयोजित केलेल्या नांदेड सभेत धर्माच्या आधारे आरक्षण देणे घटनात्मक नाही. त्यामुळे ते मिळणार नाही, असे अमित शहा यांनी आवर्जून स्पष्ट केले. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधी भूमिका घेतली तर त्यांच्याविषयी मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण होत असलेली सहानुभूती कमी होईल आणि मुस्लिम मतांच्या कोणत्याही प्रश्नावर ठाकरे यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली तर त्यांचे हिंदुत्व हे बेगडी आहे, असा प्रचार भाजपकडून होऊ शकतो. त्यामुळे सात मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांना भूमिका स्पष्ट करायला सांगण्यामागे हिंदू मतांचे विभाजन टळावे, अशी भाजपची रणनीती असल्याचे मानले जात आहे.
मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्या मराठवाड्यात अमित शहा यांची सभा झाली, त्या प्रदेशात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आता फक्त दोन खासदार बाकी आहेत. परभणीचे संजय जाधव आणि धाराशीवचे ओम राजेनिबांळकर. ठाकरे यांच्याबरोबर विधिमंडळातील केवळ तीन सहकारी आहे. धाराशीवचे कैलास पाटील, परभणीचे डॉ. राहुल पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे. नेते शिवसेनेतून गेले तरी शिवसैनिक अजूनही ठाकरे यांच्याबरोबर आहे, हे वास्तव भाजपला विविध सर्वेक्षणांतून कळाले असल्याने ठाकरे यांचे नाव ११ वेळा उच्चारत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान भाजपाकडून देण्यात आले.
गेली काही वर्षे हिंदुत्वाचा झेंडा मिरवत असताना उद्धव ठाकरे यांनी एमआयएमसारख्या पक्षावर टिकेचा तिखट मारा केला होता. ‘हिरवा साप’ वगैरे अशा प्रतिमा त्यासाठी वापरल्या जात. एमआयएमला ‘रझाकार’ असेही संबोधले जात. शिवसेनेतील फुटीनंतर या टिकेची धार आता दिसून येत नाही. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यातील फरक मतदारांपर्यंत पोहोचवताना ठाकरेंना पेचात पकडण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यामुळेच सावरकरांच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे नव्याने वाद होऊ शकतात, असे माहीत असल्याने अमित शहा यांनी या प्रश्नी भूमिका स्पष्ट करवी, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना कात्रीत पकडण्याचा डाव टाकला आहे.
हेही वाचा – श्रीकांत शिंदे का रागावले ?
प्रबोधनकार ठाकरे यांच्या भूमिकेशी सुसंगत शिवसेनेची हिंदुत्वाची नवमांडणी शिवसैनिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘महाप्रबोधन’ यात्रेसारख्या उपक्रमातून हिंदुत्वाची जुनी व्याख्या बदलली जात असल्याचे हळुहळू शिवसैनिकांच्याही लक्षात येऊ लागली आहे. कार्यकर्ता स्तरावरील या संभ्रमावस्थेत नेत्यासमोर पेच निर्माण करण्याची रणनीतीदेखील अमित शहा यांच्या भाषणातून दिसून येत आहे. गांधी घराण्याच्या चार पिढ्या व शरद पवार यांच्याहीपेक्षा टिकेच्या केंद्रस्थानी आणत उद्धव ठाकरे यांचे नाव ११ वेळा घेतल्याने भुवया उंचावल्या जात आहेत.