संतोष प्रधान
विरोधकांच्या एकजुटीच्या ‘इंडिया’ आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याने या निमित्ताने ताकद दाखविण्याची संधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळणार आहे. पाटणा आणि बंगळुरूनंतर विरोधकांच्या ऐक्याची पुढील बैठक मुंबईत घेण्याचा निर्णय मंगळावरी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. पाटण्यातील बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तर बंगळुरूमधील बैठकीचे आयोजन काँग्रेस किंवा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले होते. मुंबईत शरद पवार गटाची फारशी ताकद नाही. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मुंबईत ताकद आहे. पण मुंबईतील बैठकीची सारी जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांची असेल.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरह २० टक्के शिवसैनिकांमध्ये चलबिचल झाली. पण ८० टक्के कार्यकर्ते हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहेत, असा शिवसेना नेत्यांचा दावा असतो. ठाकरे गटाने मुंबईवरील आपली पकड कायम राखली आहे. ‘इंडिया’च्या बैठकीच्या निमित्ताने ठाकरे गट आपली ताकद दाखवून देईल. ठाकरे गटाला राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची या बैठकीच्या निमित्ताने संधीच मिळाली आहे.
हेही वाचा… कोल्हापुरमध्ये राष्ट्रवादीतील दोन गटांत अस्तित्वाचा सामना
हेही वाचा… नगरमध्ये राजकीय समीकरणे बदलली, सुजय विखे यांच्यासमोर प्रतिस्पर्धी कोण ?
‘इंडिया’च्या बैठकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हादरा देण्याचा शिंदे गट व भाजपचा प्रयत्न असेल. यामुळे विरोधकांची मुंबईतील आगामी बैठक गाजण्याची चिन्हे आहेत.