हिंगोली : महाविकास आघाडीत हिंगोलीची जागा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने मागूनही शिवसेनेने या जागेवरील दावा कायम ठेवला. नवा चेहरा म्हणून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे उमेदवारीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या दोन गटात होईल अशी चिन्हे आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशा पारंपरिक लढती झाल्या. माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी खासदार सुभाष वानखेडे आदीजणही उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी इमानेइतबारे पक्षाचे काम करू, असे आश्वासन तिघांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर दिले होते. माजी आमदार आष्टीकरांना त्यांच्या वडिलांकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील बापुराव पाटील आष्टीकर हे विधानसभा सदस्य होते. त्यानंतर नागेश पाटील यांनी हदगाव बाजार समितीच्या संचालक पदावरून राजकीय प्रवास सुरू केला. ते बाजार समितीचे १२ वर्षे संचालक होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१३ मध्ये शिवसेेनचे तालुकाप्रमुख म्हणून काम पाहिले. २०१४ च्या विधासभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली अन विधानसभेत प्रवेश केला. त्यांना आता मोठी संधी मिळाली आहे. सहकार क्षेत्रात विविध पदावर आष्टीकर यांनी या पूर्वी काम केले आहे.
हेही वाचा… सांगलीत दादा घराण्याच्या अस्तित्वाचा लढा
हेही वाचा… निवडणूक चिखलीकरांची; पण कसोटी अशोक चव्हाण यांची!
हिंगोली मतदारसंघात अवैघ धंदे, मराठा मोर्चाला मिळणार प्रतिसाद या जोरावर ते कसा प्रचार करतात, यावर त्यांचा जय-पराजय ठरू शकतो. शिवसेनेच्या ठाकरे गटाने नवा चेहरा दिल्याने निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे.