ओऽऽऽ सुषमाताई! विरोधाला विरोध म्हणून काहीही बोलाल काय? कार्यक्षमतेच्या बाबतीत तुमच्या साहेबांपेक्षा शिंदेसाहेब कितीतरी उजवे हे ध्यानात घ्या जरा! आमचे साहेब आठ तासाला दहा हजार फायलींवर सह्या करतात म्हणजे करतात. उगीच कशाला गणिताचे कोष्टक मांडता? म्हणे तासाला १२५०, मिनिटाला २० व अडीच सेकंदात एक. तुम्हाला नाही जमायचे ते. अहो, फायली समोर नसतानासुद्धा त्यांचे हात शिवशिवत असतात नुसते स्वाक्षरीसाठी. काहीच नाही भेटले तर ते कोऱ्या कागदावर सह्या करून ‘वेग’ वाढवतात. फाइल समोर आली की नजर टाकण्यासाठी एक सेकंद, वाचण्यासाठी दुसरा व सहीसाठी अर्धा सेकंद एवढाच वेळ लागतो त्यांना. भावना ‘नि:स्वार्थ’ असली की जुळते हे गणित बरोबर. तुमच्या साहेबांसारखे विचार करत बसत नाहीत ते! तसे केले की आमदारांची संख्या कशी झपाट्याने कमी होते ते विचारा तुमच्या साहेबांना. राज्य चालवणे म्हणजे कॅरम खेळणे नव्हे! जगातील सर्वाधिक सह्या करणारा राज्यप्रमुख असा विश्वविक्रम नोंदवायचाय त्यांना. कशाला उगीच टोचणी लावता. अडीच सेकंदात फाइल मोकळी व्हावी म्हणून खास प्रशिक्षित साहाय्यक ठेवलेत शिंदेसाहेबांनी. अर्ध्या सेकंदाचाही उशीर खपत नाही त्यांना. कुठल्या सहीचा कुणाला किती लाभ याचा विचारही नसतो त्यांच्या डोक्यात. तुमच्या साहेबांसारखे पेनही बदलवत नाहीत ते वारंवार.
हेही वाचा : हरयाणाच्या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपला बळ
एकच पेन व तोही ‘लाल शाईचा’. सही लवकर व्हावी म्हणून शाईसुद्धा ते स्वीस कंपनीची वापरतात. बोटे दुखू नयेत म्हणून दर आठ तासांनी मलम लावतात. अठरा तास काम व त्यातले आठ तास सह्या हाच त्यांचा दिनक्रम. तुमच्या साहेबांसारखे दिवसाला एक सभा व शून्य सह्या करत नाहीत ते. मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या प्रतीक्षेत खरोखर इतक्या फायली असतात का, असे विचारूच नका व अल्लाउद्दीनच्या दिव्याची उपमा तर नकोच. राग आला तर तुमच्याकडे राहिलेले १७ दिवेसुद्धा क्षणात विझवून टाकतील ते! समजलं का अंधारेताई!
श्री.फ.टाके