ठाणे : नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रलंबित प्रस्ताव याच भागातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यात निर्माण झालेली अडसर आणि संजीव नाईक यांची उमेदवारी डावलली गेल्याने आगरी, कोळी, प्रकल्पग्रस्त समाजात असलेली नाराजी गृहीत धरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ठाण्यात या समाजाच्या ध्रुवीकरणाचे पद्धशीर प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे.
नवी मुंबईत घेतलेल्या मेळाव्यात राजन विचारे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न हाती घेतला. याशिवाय, अटकेत असलेले आगरी समाजाचे पदाधिकारी एम.के. मढवी यांच्या अटकेचा मुद्दाही स्वत: उद्धव ठाकरे आणि विचारे या दोघांनीही तापविण्याचा प्रयत्न केला. मिरा भाईंदरमधील कोळी समाजाचे प्रश्न तसेच ठाणे, बाळकूम भागातील आगरी समाजाला चुचकारण्यासाठी देवराम भोईर आणि संजय भोईर यांच्यावर झालेल्या कथित राजकीय अन्यायाच्या चर्चाही उद्धव सेनेकडून पद्धशीरपणे घडविली जात आहे. या मतदारसंघात असलेल्या दोन लाखाहून अधिक आगरी, कोळी समाजातील मतांची रसद पक्षामागे उभी करण्यासाठी काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या जात असल्याचे समजते.
हेही वाचा…पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत भाजप, शिवसेना ठाकरे गटाची कसोटी; १० जूनला निवडणूक
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा कोंडवळा गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने बदलला असला तरी या भागात असलेल्या आगरी कोळी समाजाचे मतदान नेहमी वैशिष्ठपूर्ण राहिले आहे. १२ वर्षांहून अधिक काळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले गणेश नाईक हे आगरी समाजाचे मातब्बर नेते मानले जातात. ठाण्याचा बदललेला सामाजिक चेहरा नाईक यांनी राजकीय नेता म्हणून पूरेपूर लक्षात घेतला. त्यामुळे आगरी समाजाचे मोठे पाठबळ असतानाही नाईक यांनी स्वत:ची प्रतिमा बहुभाषिक समाजाचा नेता म्हणून उभी केली. या दुहेरी समीकरणाचा राजकीय फायदा अनेक दशक नाईक यांना झाला. २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या ठाणे लोकसभा मतदार संघात संजीव नाईक हे खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार विजय चौघुले यांचा पराभव करताना नाईक यांना एकगठ्ठा आगरी, कोळी समाजाच्या मतदानाची रसद उपयोगी ठरली. नवी मुंबई महापालिका हद्दीत २९ गावांमधून अजूनही आगरी, कोळी समाजाचे मोठे मतदान आहे. ठाण्यातील बाळकूम, कोलशेत, ढोकाळी, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली याशिवाय मिरा भाईंदर भागातील उत्तन तसेच आस-पासच्या परिसरात अजूनही मोठ्याप्रमाणावर आगरी कोळी समाजाची वस्ती आहे. उत्तन भागात एक मोठा समाज मासेमारीवर अवलंबून असून या भागात जेट्टी उभारणे, मासेमारीसाठी पेट्रोल दिवे उभे करून देणे अशी काही कामे विचारे यांनी ठरवून गेल्या १० वर्षांत केली आहे. संजीव नाईक यांना उमेदवारी मिळाली नसल्याने आगरी कोळी मते कोणाकडे वळतात याविषयी कमालीची उत्सुकता असून याच मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न उद्धव सेनेने सुरू केला आहे.
हेही वाचा…बसपा अध्यक्ष मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद नेमका कोण?
नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा ठाण्यातही प्रभावी?
नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचे मंत्रीपद असताना त्यांनी या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडला होता. आगरी, कोळी समाजात यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे दिसू लागले होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्यांनी हा असंतोष नेमका टिपला आणि ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी, कोळी समाजाला एकवटण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरून प्रकल्प ग्रस्तांचा अभूतपूर्व मोर्चा निघाला होता. मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत असताना दोन दिवस अगोदर उद्धव ठाकरे यांनी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव पुन्हा मंजूर केला आणि दिल्लीत मंजूरीसाठी पाठवला. तेव्हापासून आजतागायत हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे. मध्यंतरी नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग देण्यासाठी आलेले केंद्रीय नागरी उड्डायणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांना प्रकल्पग्रस्तांचे नेते भेटले. या भेटीनंतही दि.बा. यांच्या नावाचा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. नेमका हाच मुद्दा हेरत विचारे यांनी नवी मुंबईतील सभेत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. संजीव नाईक यांना उमेदवारी मिळाली नसल्याने आगरी समाजाचा एकही मोठा नेता निवडणूक रिंगणात नाही. त्यामुळे उद्धव सेनेकडून या मतांवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरे नियमित करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून प्रकल्पग्रस्त मुख्यमंत्र्यासमवेत आहेत असा दावा शिंदे सेनेचे नवी मुंबईतील नेते शिवराम पाटील यांनी केला.