सुहास सरदेशमुख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबाद: ‘भारत जोडो ’ नंतरही नांदेड वगळता अन्य जिल्ह्यात कॉग्रेसला यश मिळवता आले नाही. तर लातूर, जालना व बीड जिल्हा वगळता भाजपच्या हाती फारसे काही लागले नाही. ज्या जिल्ह्यात जो नेता त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांलाच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यश मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण तालुक्यात फारसे यश मिळाले नाही. मात्र, नेहमी वादात असणारे अब्दुल सत्तार समर्थकांना मात्र यश मिळाल्याचे चित्र ग्राम पंचायत निवडणुकीनंतर स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे.

भाजपतील नेत्यांच्या वर्तनातून तसेच योजनांच्या अंमलबजावणीतून ग्रामीण भागात फक्त भाजपचेच वर्चस्व असल्याचा भाजपचा दावा असला तरी तो सर्वदूर असल्याचे चित्र मराठवाड्यात दिसून येत नाही.ज्या भागात ज्या नेत्याचा प्रभाव त्या भागात त्याचे कार्यकर्ते निवडून आले. या निवडणुकीमध्ये शहरी मतदारांना गावी परत आणण्यासाठी खासगी बस गाड्यांना तोबा गर्दी होती. लातूर ते पुणे या काळातील प्रवास भाडे थेट दोन हजार रुपयांपर्यंत वधारले होते.

हेही वाचा: कोल्हापुरात महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपचेही यश उल्लेखनीय

अन्य जिल्ह्यातील तिकिटे मिळत नव्हती. त्यामुळे निवडणूक निकालानंतरच शहरी मंडळी मुंबई व पुण्याकडे परतली. पण तोपर्यंत राजकारणाचा ग्रामीण पोत स्पष्ट झाला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने ७६ ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे. उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात शिवसेनेला यश मिळाले खरे पण ते ही घवघवीत असे दिसून आले नाही.

हेही वाचा: सारथ्य समृद्धीवरचे आणि राजकारणाचे: शिदेंसाठी एक सुसह्य, दुसरे हादरे देणारे

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे यश तर अतिशय माफक असेच दिसून आले. वैजापूर येथील आमदार रमेश बोरनारे आणि ज्ञानराज चौगुले हे दोन ग्रामीण भागातील आमदारांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी बरीच दमछाक करावी लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान निवडून येणारे आपल्याच पक्षातील असा दावा आता सर्व पातळ्यांवर केला जात आहे. महाविकास आघाडी असे मोठ्या राजकीय पटलावर चित्र ग्रामीण भागात दिसून आले नाही. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पगडा कायम राहिला. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात राणा जगजीतसिंह यांच्या प्रभावामुळे भाजपचा प्रभावही वाढताना दिसतो आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray shivsena dominated the rural areas of aurangabad district in the grampanchayat elections bjp and shinde group print politics news tmb 01