उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वांद्रे पूर्वच्या जागेवरून वरूण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांची थेट लढत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांच्याशी होणार आहे. खरं तर हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. कारण उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान याच मतदारसंघात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महत्त्वाचे म्हणजे वरुण सरदेसाईंना ठाकरे गटाने पहिल्याच यादी स्थान दिल्याने राजकीय वर्तुळातही विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. दरम्यान, वरूण सरदेसाई नेमके कोण आहेत? आणि ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी का दिली? याविषयी जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत वरूण सरदेसाई?

वरूण सरदेसाई हे आमदार आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ आहेत. आदित्य ठाकरे यांच्यानंतर निवडणूक लढणारे ते ठाकरे घराण्यातील दुसरे सदस्य आहे. पेशाने सिव्हिल इंजिनीअर असलेले वरूण सरदेसाई यांनी २०१८ मध्ये सक्रीय राजकारणाला सुरुवात केली. २०१८ मध्ये त्यांना युवासेनेचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर ते पक्षाच्या अनेक आंदोलनात प्रमुख चेहरा होते.

हेही वाचा – Nagpur South West Assembly Constituency : आजी विरुद्ध माजी गृहमंत्र्यांमधील लढतीची अफवाच ठरली …..

या आंदोलनांपैकीच एक आंदोलन म्हणजे २०२२ साली अमरावतीच्या तत्कालीन खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांना जोरदार विरोध करण्यात आला. या आंदोलनात वरुण सरदेसाई हे आघाडीवर होते. याशिवाय भाजपाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांनी राणेंच्या निवास्थानासमोरही आंदोलन केलं होते.

वरूण सरदेसाई हे त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनासाठी ओखळले जातात. २०१७ साली झालेली मुंबई मनपाची निवडणूक असो किंवा २०१८ साली झालेली मुंबई विद्यापीठातीन सीनेटची निवडणूक असो, या दोन्ही निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना वांद्रे पूर्वतून उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्येही वरुण सरदेसाईंना संधी दिली जाईल अशी चर्चा होती. पण वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दिकींच्या विरोधात विश्वनाथ महाडेश्वर यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांनी महाडेश्वर यांचा पराभव केला होता. या खेपेला वरुण सरदेसाई यांची लढत झिशान सिद्दिकी यांच्याशी होणार आहे. मात्र, त्यांच्यासाठी ही लढत म्हणावी तितकी सोपी नक्कीच नाही. कारण झिशान सिद्दिकींचे वडील बाबा सिद्दिकी यांची नुकतीच हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत सध्या सहानुभूतीची लाट आहे.

हेही वाचा – Mahavikas Aghadi Seat Sharing : ‘मविआ’च्या जागावाटपात काँग्रेस आणि ठाकरे गटातील संघर्षात शरद पवारांनी कशी मारली बाजी?

काँग्रेसने अलीकडे झिशान सिद्दिकी यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर आज त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार गटाने त्यांनी वांद्रेपूर्व येथून उमेदवारीही दिली आहे. वरूण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर होताच झिशान सिद्दिकी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. “जुन्या मित्रांनी (उद्धव ठाकरे) वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. यांनी कधीच कोणाची साथ दिली नाही. जो आदर आणि सन्मान देईलत्याच्याबरोबरची नाती सांभाळा, आपापल्या फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नसतो. आता जनता निर्णय घेईल!” असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray shivsena pick varun sardesai for bandra east know who he is spb