छत्रपती संभाजीनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवारी ठरवताना मला विचारले गेले नाही. अंबादास दानवे अन्य पक्षातून कार्यकर्ते आणत. त्यांना उमेदवारी देत. उमेदवारी दिल्यानंतर आपण त्या उमेदवारांचे इमाने इतबारे काम केले. पण तेव्हा उमेदवारी देताना आपले मत विचारले गेले नव्हते. आजही विविध प्रकारच्या नियोजनात, उपक्रमात विरोधी पक्ष नेते दानवे आपणास विश्वासात घेत नाहीत, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

पत्रकार बैठकीत अंबादास दानवे यांचे नाव न घेता ते आरोप करत होते. त्याचे नाव घेण्याची वेळ आली की, ‘तो नेता तुम्ही समजून घ्या ना ’ असे ते म्हणत होते. मात्र पत्रकार बैठकीत शेवटी त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारी देताना आपणास विचारलेच गेले नाही, याचा उल्लेख करताना त्यांनी दानवे यांचे नाव घेऊन टीका केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटास मोठी गळती लागल्याचे चित्र दिसत असले तरी संघटना मजबूत असल्याचा दावा त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजू वैद्य यांनी चंद्रकांत खैरे यांच्याविषयी काही कारणास्तव नाराजी असल्याचा उल्लेख राजीनामा पत्रात केला होता. त्यांच्याविषयी फारसे बोलणार नाही. पण त्यांनाही त्याच नेत्याने उमेदवारी दिली होती, असा उल्लेख करत खैरे म्हणाले, राजू वैद्य यांनी शिवसेनेच्या महापौरांना त्रास दिला. शहरातील अनेक विकास योजनांमध्ये मोडता घातला. त्यांनी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योजकांना ‘ ब्लॅक मेल ’ केले होते, असा आरोपही केला.

समजून घ्या ना तुम्ही

राजू वैद्य यांच्या आरोपानंतर बोलावलेल्या तातडीच्या पत्रकार बैठकीत बोलताना खैरे यांनी शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीस अंबादास दानवे हेच जबाबदार असल्याचे नाव न घेता वारंवार सांगितले. नाव घेता केल्या जाणाऱ्या प्रत्येक आरोपाच्या वेळी त्या नेत्याचे नाव तुम्ही समजून घ्या, असे सांगत होते. ‘ राजू वैद्य यांना त्यांनीच उमेदवारी दिली होती. अन्य पक्षातून उमेदवार आणायचा आणि त्याला उमदेवारी द्यायची. यास विरोध होता. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवाऱ्या मिळवून देताना आपला काही एक संबंध नव्हता असे खैरे म्हणाले. असे असले तरी शिवसेना पक्षाशी आपण बांधिल असून आपण एकनिष्ठपणे काम करत राहू. पक्षप्रमूख उद्धव ठाकरे सांगतील ती सारी कामे ताकदीने पूर्ण करू, असेही खैरे म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर समांतर जलवाहिनी हा इलाज होता. पण तेव्हा ती योजना हाणून पाडण्यात आली. आता २७५० कोटी रुपये तरतूद करुनही पाण्याची समस्या कायम आहे. या विरोधात शिवसेना महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचे खैरे म्हणाले. या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे दिले जाईल असेही ते म्हणाले.