रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करून भाजपाचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कोकणातील गडाला सुरूंग लावला आहे.

खरे तर या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे राणे यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली. त्यापूर्वी संपूर्ण मतदारसंघात राऊत यांच्या प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. त्याचप्रमाणे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीनंतर या दोन जिल्ह्यांमधील काही मातब्बर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तंबूमध्ये सामील झाले असले तरी कार्यकर्त्यांचे सैन्य पाठीमागे शिल्लक होते. राऊत यांच्यासाठी ही आणखी एक जमेची बाजू होती. त्या तुलनेत या दोन जिल्ह्यांमध्ये भाजपाचे पक्ष संघटन खूपच दुबळे आहे. या पार्श्वभूमीवर राणेंची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा राऊत यांनी ‘देव पावला’, अशी प्रतिक्रिया देऊन जणू काही ही निवडणूक आपण सहज जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. खरे तर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पहिले काही दिवस तसेच वातावरण होते. पण मतदानाचा दिवस जवळ यायला लागला तसे येथील राजकारणामध्ये मुरलेले नारायण राणे यांनी आपले फासे टाकायला सुरुवात केली. जोडीला माजी खासदार निलेश आणि भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश हे दोन चिरंजीवही त्यांच्या शैलीत कामाला लागले होते.

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtra CM Devendra Fadnavis Attends Shaurya Diwas Program In Panipat
…तर देशाचा इतिहास वेगळा असता! पानिपतमध्ये मराठा शौर्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे योद्ध्यांना अभिवादन
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
Eknath Shinde Group , Pratap Sarnaik,
स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”

हेही वाचा… Lok Sabha Election Result 2024 Updates: भाजपाचा पराभव फक्त अयोध्येत नाही, एकूण ५ जागा गमावल्या; वाराणसी वगळता १२ पैकी ९ ठिकाणी बसला फटका!

गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन जिल्ह्यांमध्ये मिळून त्यावेळच्या अखंडित शिवसेनेचे आठपैकी सहा आमदार निवडून आले होते. त्यापैकी योगेश कदम (दापोली), उदय सामंत (रत्नागिरी) आणि दीपक केसरकर (सावंतवाडी) यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचा रस्ता धरल्याने भास्कर जाधव (गुहागर), राजन साळवी (राजापूर) आणि वैभव नाईक (कुडाळ) हे तीन आमदार ठाकरे गटाकडे शिल्लक राहिले. त्यापैकी गुहागर विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने येथील मतदानाच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नव्हता. पण त्या जागी चिपळूणचे अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम प्रचारात हिरीरीने सहभागी झाले. पण राणे पिता-पुत्रांनी भाजपासह कोणाही नेत्यांच्या सहकार्यावर फार अवलंबून न राहता सिंधुदुर्ग जिल्ह्यावर स्वतःच्या पद्धतीने लक्ष केंद्रित करून ‘भूमिगत’ प्रचाराचा अवलंब केला. कारण गेल्या तीन लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून त्यांच्या हे लक्षात आले असावे की, रत्नागिरी जिल्ह्यातून आपल्याला फारशी आघाडी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तिथून प्रतिस्पर्ध्याला मिळणारी आघाडी तोडून विजय मिळवता येईल इतके भक्कम मताधिक्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने त्यांनी व्यूहरचना केली. राणे रत्नागिरी जिल्ह्यात मुक्काम ठोकून असताना हे दोन बंधू ठाकरे गटाच्या नेत्यांना गाफील ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाळे विणत होते आणि जिल्ह्यातील मतदार व त्यांच्या म्होरक्यांना त्यामध्ये ओढत होते. त्यासाठी जिल्ह्यातील दीर्घ राजकीय अनुभवाचा त्यांना फायदा झाला. शिवाय मतांची जुळणी करण्यासाठी हात सैल सोडण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे त्या जिल्ह्यातून मिळालेल्या सुमारे एक लाख मतांच्या आघाडीवर राणेंनी या निवडणुकीत बाजी मारली.

राज्यात इतर अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेत यशाचे शिखर गाठले. पण या मतदारसंघात राणे आणि राऊत यांना विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान पाहिले तर, रत्नागिरीने नाकारले तरी सिंधुदुर्गाने स्वीकारल्यामुळे राणेंना हा विजय शक्य झाला, हे स्पष्ट होत आहे. त्या दृष्टीने या दोन्ही उमेदवारांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.

हेही वाचा… सत्तास्थापनेचं ठरलं, आता मंत्रीपदांसाठी चढाओढ; १२ खासदारांच्या संख्याबळावर नितीश कुमार तीन खात्यांसाठी आग्रही!

या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण मतदारसंघात राणे यांना सुमारे ६० हजार, तर राऊत यांना ७९ हजार मते पडली. रत्नागिरी मतदारसंघात राणेंना ७४ हजार , तर राऊतांना ८४ हजार आणि राजापूर मतदारसंघात राणेंना ५३ हजार, तर राऊत यांना ७४ हजार मते पडली. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातून राऊतांनी सुमारे ५० हजार मतांची आघाडी घेतली. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये राणेंनी घेतलेल्या आघाडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. या तीन मतदारसंघांपैकी नितेश यांच्या कणकवली मतदारसंघात राणे यांना सुमारे ९२ हजार, तर राऊत यांना ५० हजार मते पडली. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघातही लक्षणीय आघाडी घेण्याचा चमत्कार राणेंनी घडवला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येथून इच्छुक असलेले राणेंचे थोरले चिरंजीव निलेश यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, असे सांगितले जाते. येथे राणेंना ७९ हजार, तर राऊत यांना ५३ हजार मते पडली. राणेंनी दीर्घकाळ राजकीय वैर असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या निवडणुकीत कितपत मदत करतील, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. पण तिथेही राणे यांना ८५ हजार , तर राऊत यांना ५३ हजार मते पडल्यामुळे या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून राणेंनी एकूण सुमारे एक लाख मतांची अभेद्य आघाडी मिळवली.

ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती असल्यामुळे गेल्या सुमारे २५ वर्षांत भाजपाने कोकणाकडे तसे दुर्लक्षच केले. पण ही युती मोडल्यानंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेकडून हा मतदार संघ खेचून घेत तिथे विजयही मिळवला. याचा उपयोग आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करण्याचा भाजपाचा इरादा स्पष्ट आहे. अर्थात तो तेवढ्या प्रमाणात लगेच साधेल, असे नाही. पण या विजयामुळे तळकोकणात भाजपाने चांगल्या तऱ्हेने पुनरागमन केले आहे, एवढे निश्चित.

Story img Loader