नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ४ ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर येत असून ते विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून महाविकास आघाडीतील जागावाटपावर ऑगस्ट महिन्यापर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> Parliament Budget Session : माझा आवाज दाबण्याचा विरोधकांचा प्रयत्न -पंतप्रधान
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय मुंबईमध्ये पक्षसंघटनेच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो मात्र, काँग्रेसचा निर्णय दिल्लीतील पक्षाचे केंद्रीय नेतेच घेणार आहेत. तसे असले तरी, ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामध्ये जागावाटपावर चर्चा होणार नसल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. मात्र, ठाकरे पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याने काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशीही ठाकरेंची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीत रामलीला मैदानावर झालेल्या ‘इंडिया’च्या सभेमध्ये ठाकरे सहभागी होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू असल्याने पक्षाच्या खासदारांशीही ठाकरे संवाद साधणार आहेत.