राहाता : ‘जनसंवाद यात्रे’च्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांनी दोन दिवसांत तब्बल ६ सभा घेतल्या, मात्र त्यांच्या दौऱ्यावर मतदारसंघातील शिवसेना अंतर्गत गटबाजीची झालर दिसून आली. ‘उबाठा गटा’चे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्ष बदलाबरोबरच त्यांनी दहा वर्षे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी कुठलाही संबंध ठेवला नव्हता, त्यांच्या कार्यपद्धतीवर गटाचे निष्ठावान शिवसैनिक नाराज आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी आपली उपस्थिती दाखवली तरी एक गट वाकचौरेंच्या विरोधात आहे. या दौऱ्यात ठाकरे यांना त्याचा अंदाज आला असावा म्हणूनच कदाचित वाकचौरेंच्या उमेदवारीचे सुतोवाचही त्यांनी केले नसावे.
शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनीही या सर्व नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करत वाकचौरे यांची पदाधिकाऱ्यांसमोर कानउघडणी केल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘शिर्डी’त सभांचा धडाका लावताना दोन दिवसांच्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांची एकही बैठक घेतली नाही. ठाकरे मतदारसंघात येत असतानाच जिल्हा समन्वयक नितीन औताडे यांनी राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. जवळीक दाखवण्यासाठी अनेक पदाधिकारी ठाकरे यांच्या मागेपुढे करित असल्याचे दिसून येते होते. ठाकरेंच्या सभांना जनतेतून प्रतिसाद चांगला मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील भाषणाची धार वाढलेली आहे. अनेक ठिकाणी वाटेवर त्यांचे मोठे जंगी स्वागत करण्यात आले. दीर्घ कालावधीनंतर मतदारसंघात दौरा होत असल्याने शिवसैनिकातील उत्साह वाढवणारा होता. त्याचबरोबर ‘मविआ’मधील वातावरण निर्मितीसाठी मदतच झाली आहे, मात्र शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे वगळता असले तरी ‘मविआ’तील नेत्यांची उपस्थिती दिसली नाही.
हेही वाचा – ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा सौरयंत्रणेवर सुरु
शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाची संघटना काहीशी खिळखिळी झाली आहे. पाठिंबा देणारे अपक्ष शंकरराव गडाख हे केवळ एकच आमदार मतदारसंघात आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यामुळे जुन्या व निष्ठावान शिवसैनिकांत उत्साह दिसला तरी उबाठा गटातील अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी ठाकरे यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार वाकचौरे यांनी गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून गटाचे पदाधिकारी बदलल्याने अंतर्गत धुसफूस चालू आहे. ती शमली नसल्याचा फटका वाकचौरे यांना बसण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.
‘शिर्डी’ची जागा राखीव आहे. शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने ठाकरे यांनी या जागेवर हक्क सांगितला आहे. या जागेवर काँग्रेसनेही दावा केला आहे. शिर्डीची जागा कोणाकडे, हा प्रश्न महायुतीबरोबरच ‘मविआ’मध्ये सुटलेला नाही. मात्र मतदारसंघात तब्बल ६ सभा घेत त्यांनी शिर्डीवरील दावा सोडणार नाही, हेच स्पष्ट केले. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. दौऱ्यात वाकचौरे ठाकरेंच्या सोबत व्यासपीठावर होते, मात्र ठाकरे यांनी वाकचौरेंचे उमेदवार म्हणून संकेत देणेही टाळल्याची कुजबुज असली तरी जागावाटप घोषित नसल्याने टाळले असावे, असा दावा वाकचौरे समर्थक करतात.
राहुरीतील सभेत ‘विधानसभा तर ठरलेलीच आहे’ असे सांगताना त्यांनी आमदार तनपुरे (शरद पवार गट) यांच्याकडे हात करत एकप्रकारे पवार गटाचे उमेदवार कोण हे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभेबाबत बोलताना त्यांनी ‘आपल्या हक्काचा खासदार दिल्लीत पुन्हा पाठवायचा आहे, असे सांगताना कोणताही इशारा केला नाही. गमतीचा भाग म्हणजे लोकसभेचा उल्लेख होताना आमदार तनपुरे यांनी शेजारीच उभ्या असलेल्या वाकचौरे यांना हाताने पुढे सरकवत सूचक संकेत देण्याच्या प्रयत्नात होते. मात्र वाकचौरे हे काही जागचे हलले नाहीत. तनपुरे यांच्याकडून सहज झालेली ही तात्कालिक सहजकृती जाणकारांच्या नजरेतून सुटली नाही. एकूणच ठाकरेंनी लोकसभेचे रणशिंग शिर्डीसाठी फुंकले असले तरी भाऊसाहेब वाकचौरेंच्या उमेदवारीबाबत नावाचे साधे संकेतही का दिले नाही? याची चर्चा होत आहे.
ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजीमंत्री बबनराव घोलप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याची छायाचित्रे समाज माध्यमातून प्रसारित होत आहेत. मात्र विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी पूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे घोलप यांचे हे दबावतंत्र असल्याचे बोलले जाते. याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही शिर्डीची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. एकूणच शिर्डीच्या जागेची उमेदवारी गुलदस्त्यातच ठेवणे सर्वच पक्षांनी पसंत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे यांनी वाकचौरेंना सोबत घेत शिर्डीतील लोकसभेचे रणशिंग फुंकले तरी स्पष्टपणे उमेदवार म्हणून वाकचौरेंचे ‘प्रमोशन’ करणे टाळले.