आगामी मुंबई, ठाणे तसेच अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा नव्याने जुंपली आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी विजय संपादन केल्यानेच आता आपल्याला सूड उगवायचा आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी लढाईचे नव्याने रणशिंग फुंकले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे मेळावे परस्परांवरील टीकाटिप्पणी व आरोप-प्रत्यारोपांनीच गाजले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे अधिक खासदार निवड़ून आले होते. त्यामुळे आमचीच शिवसेना खरी, असा दावा उद्धव ठाकरे करीत होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बधणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जेमतेम २०चा आकडा गाठता आला. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेना ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई आहे. आधीच खासदार व आमदारांबाबत संशयाचे वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकल्यास ठाकरे गटाला ताकद मिळेल. महानगरपालिकेतही अपयश आल्यास ठाकरे गटासाठी मोठा धोका असेल. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिकंण्याचा निश्चय केला आहे. यासाठी प्रसंगी स्वबळावर लढण्याचे सुतोवाच करीत शिवसैनिकांना आधार दिला आहे. कारण आघाडीतून लढणार हे जाहीर केल्यास अनेक इच्छूक शिंदे गट किंवा अन्य पक्षात जाण्याची भीती आहे.
विधानसभेच्या यशानंतर शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला. खरी शिवसेना कोणती या वादात जनतेने शिंदे यांना कौल दिला. मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळाले नसले तरी ठाकरे यांच्यावर मात केल्याचे शिंदे यांना समाधान आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मुंबई , ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी महानगरपालिकांकडून ठाकरे गटाला संपविणे हे शिंदे यांचे उद्दिष्ट आहे. कारण या निवडणुकीत ठाकरे गटाला यश मिळाल्यास शिंदे यांच्या पक्षासमोर आव्हान उभे राहू शकेल. यामुळेच मुख्यमंत्रीपद न मिळाल्याचे दु:ख विसरून शिंदे यांना भाजपच्या मागे सारी ताकद उभी करावी लागणार आहे. सूड उगवण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले आहे. ठाकरे यांच्याकडून मुंबई महानगरापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली जाईल हे स्पष्टच दिसते. यामुळेच शिंदे यांनाही तशी रणनीती आखावी लागेल.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कमधील स्मारक हा ठाकरे व शिंदे यांच्यातील वादाचा नवीन मुद्दा असेल हे सुद्धा अधोरेखित झाले. ठाकरे यांचे स्मारक राज्य शासनाच्या मदतीने उभारण्यात येत असले तरी त्यावर नियंत्रण उद्धव ठाकरे यांचे आहे. ही बाब शिंदे यांना खटकते. त्यातच स्मारकाच्या तयारीची माहिती देताना झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांनाच लक्ष्य केले होते. शिवसेना सोडून गेलेल्यांना स्मारकात वाव नाही व त्यांना निमंत्रणही देणार नाही, असे जाहीर करून टाकले. ही बाब शिंदे व त्यांच्या समर्थकांना फारच लागली. यातूनच स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिंदे गटाने केली.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या उद्घटनावरून ठाकरे व शिंदे गट पुन्हा समोरासमोर येणार आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची असेल. फडणवीस ठाकरे की शिंदे कोणाला झुकते माप देतात याचीही उत्सुकता असेल.