मुंबई : धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. एकही धारावीकर बाहेर जाणार नाही. त्यांचे मिठागरांच्या जमिनी किंवा पथकर नाक्यांच्या जागांवर स्थलांतर आम्ही मान्य करणार नाही. मुंबईचे नागरी संतुलन बिघडविण्याचे काम सध्या सुुरू आहे. मुंबई अदानींचे शहर होऊ देणार नाही. धारावीकरांना पात्र-अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकवून धारावीची संपूर्ण जागा अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव उधळून लावला जाईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिला.
धारावी पुनर्विकास प्रश्नावर ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. धारावी पुनर्विकासाच्या ५९० एकर जागेवरील प्रकल्पात ३०० एकर जागेवर गृहनिर्माण प्रकल्प होणार आहेत. धारावीकरांना हाकलून कुर्ला येथील मदर डेअरी, दहिसर, मुलुंड येथील पथकर नाके, मिठागरांच्या जमिनी, अशा मुंबईतील २० जागांवर पुनर्वसन करण्याचा डाव ‘लाडक्या मित्रा’साठी आखण्यात आला आहे. त्यासाठी मुंबईतील जागा अधिग्रहित करण्याचे काम सुरू आहे. हजारो एकर जमीन अदानीला दिली जाणार आहे. या प्रकल्पात तयार होणारा विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) विकण्याचा अधिकार अदानीला यापूर्वी देण्यात आला. प्रकल्पासाठी लागणारे परवाने १५ दिवसांत दिले नाहीत, तर ती परवानगी गृहीत धरली जाणार आहे. अशा सवलती इतर विकासकांना का दिल्या गेल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून या निविदा प्रक्रियेत भाग घेणाऱ्या एखाद्या विकासकाने न्यायालयात दाद मगितली तर ही निविदा रद्द होऊ शकते, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.मुंबईला अदानींचे शहर बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल, तर त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उदाहरण एकदा आठवावे. मराठी माणूस एकवटला, तर काय होते ते कळेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
हेही वाचा >>>आनंद दिघे यांच्याकडून हिंदुत्वाचे नाही तर संपूर्ण समाजाचे रक्षण- एकनाथ शिंदे
‘धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास नाही’
धारावी पुनर्विकासाचा आराखडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या नवीन वसाहतीसाठी कोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत, ते अजून स्पष्ट नाही. धारावीचा पुनर्विकास अदानींना जमणार नसेल, तर त्यांनी हा प्रकल्प सोडून द्यावा. या प्रकल्पाची निविदा पारदर्शक पद्धतीने पुन्हा काढण्यात यावी. धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास नाही, असे परखड मत ठाकरे यांनी मांडले. धारावीसाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल, असे नमूद करून महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर धारावीकरांना घर आणि उद्याोग त्याच ठिकाणी देण्यात येईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
गिफ्ट सिटी गुजरातला पळवून नेण्यात आली आणि मुंबईला अदानींचे शहर बनविण्याचा पंतप्रधान नरेेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारच्या ‘लाडका मित्र, कंत्राटदार व उद्याोजक’ अशा योजना आहेत.- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख शिवसेना, (ठाकरे गट)