शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानभवनातील तैलचित्र अनावरण समारंभास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी उपस्थित राहणार नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेने दोन कार्यक्रमांचे आयोजन केले असून ठाकरे तेथे जाणार आहेत. विधिमंडळातील ठाकरे गटाचे मोजके पदाधिकारी विधीमंडळातील कार्यक्रमास हजर राहतील आणि नंतर मेळाव्यास जाणार आहेत.
हेही वाचा- उस्मानाबादेत पीकविम्यावरून शिवसेना – भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण
शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा विधानभवनातील समारंभ सायंकाळी सहा वाजता होणार असून निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख नाही. राजशिष्टाचारात ते बसत नसल्याचे विधानभवनातील उच्चपदस्थांनी सांगितले. त्यावरून आणि मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्याने त्यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येण्याचे ठाकरे टाळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा- सोलापूरमधील संघर्ष वाढला
शिवसेनेचा दरवर्षीप्रमाणे षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर नरीमन पॉइंट येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठीही उद्धव ठाकरे सायंकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास जाणार आहेत. ते झाल्यावर ठाकरे यांनी काही वेळ तरी विधानभवनातील समारंभास हजेरी लावावी, असे प्रयत्न वरिष्ठ राजकीय नेत्यांकडून होत आहेत. पण ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते. शिवसेनेचा मेळावा दरवर्षी साधारणतपणे सायंकाळीच असतो. विधानभवनातील समारंभ सकाळी किंवा दुपारी असता तरी ठाकरे यांनी तो टाळला असता, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- अजितदादांच्या सांगली दौऱ्यात जयंतरावांची अनुपस्थिती खटकणारी
यासंदर्भात शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधला असता शिवसेनेचे दोन कार्यक्रम सोमवारी सायंकाळी होणार असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिथे असतील, मला अन्य बाबींची माहिती नाही, असे सांगितले.