अतिवृष्टीनंतर राज्य सरकारला ‘निर्दयी’ , ‘उत्सवी’ ठरवत कृषिप्रश्नी सरकारला वेढण्याची तयारी शिवसेनेकडून केली जात असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीपावलीपूर्व नुकसान पाहणी दौऱ्यातून रविवारी स्पष्ट झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे निकष बदलण्याची गरज आहे, ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते आणि मी दोघेही घरात असताना कोविड काळातच केली होती, असा तिरकस टोमणा मारत उद्धव ठाकरे यांनी कृषिप्रश्नाला दीपावलीपूर्वी आक्रमकपणे हात घातला.

हेही वाचा- महापालिका निवडणुकीत पराभवाच्या भीतीने पुण्यातील गावे वगळण्याचा भाजप-शिंदे गटाचा राजकीय घाट

घोषणांची अतिवृष्टी करणारे निर्दयी सरकार भावनाशून्य तर आहेच पण उत्सवीही आहे, अशी टीका करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या हेक्टरी ५० हजार रुपये मदत मागणीच्या पाठिशी शिवसेना उभी राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

दीपावलीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद जिल्ह्यातील दहेगाव आणि पेंढापूर या गावांतील अतिवृष्टीची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे सोयाबीन, मका, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातील काही शेतकऱ्यांची दैना माध्यमांमधून पुढे आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी काही कुटुंबांना मदत केली. शेती संकटात असताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असा संदेश प्रभावीपणे देण्याचा प्रयत्न केला जात होता. तो अधोरेखित व्हावा आणि त्याचा प्रभाव वाढता राहावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला.

हेही वाचा- बाळासाहेबांची शिवसेनेचे वायफायसह हायफाय कार्यालय; राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयास काॅर्पोरेट वळण

एका बाजूला हा दौरा सुरू असतानाच गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव या गावातील शेतकऱ्याच्या मुलास नवे कपडेही घेता येत नाहीत. कारण शेतकरी वडिलांकडे पैसेच नाहीत, हे चित्र पुढे आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी वरून संवाद साधत त्या कुटुंबाला दिलासा दिला होता. ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी त्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. त्याबाबतचे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून झळकताच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी सकाळीच ज्ञानेश्वर चव्हाण या शेतकऱ्याचे घर गाठले. त्याच्या मुलाला नवे कपडे, शिक्षणासाठी ५० हजार रुपये आणि दिवाळीचा फराळ, आनंदाचा शिधा आदी वस्तू आवर्जून नेऊन दिल्या. हे करताना त्या प्रत्येक वस्तूवर ‘मी एकनाथ शिंदे समर्थक’ अशी अक्षरेही आवर्जून लिहिली होती. ही मदत मुख्यमंत्र्यांकडून दिली जात आहे, असे सत्तार यांनी ठसविण्याचा प्रयत्न केला. सरकार शेतकऱ्यांना मदत करते आहे, हा संदेश उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आधी आवर्जून पसरविण्याचा प्रयत्न केला गेला.

हेही वाचा- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात आयात उमेदवारावरच भाजपची भिस्त

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, त्यातील तांत्रिक बारकावे याचे तपशील गोळा होण्यास अजून १० ते १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. ज्या भागात अतिवृष्टी झाली होती, त्या भागातील पंचनामे पूर्ण होईपर्यंत नव्याने नव्या ठिकाणी नुकसान होत होते. त्यामुळे रडतखडत झालेले पंचनामे पुन्हा कसे करायचे, असा पेच यंत्रणेसमोर होता. ‘सततच्या पावसामुळे झालेले नुकसान’ या सदराखाली पुन्हा सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. पण दिवाळीमुळे पंचनामे पुन्हा रखडलेले आहेत. या काळात शिवसेनेने शेतीप्रश्नावरून राज्य सरकारला वेढण्याची तयारी सुरू केली आहे. पीकविम्याचा बीड पॅटर्न राज्यभर अमलात यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान केली. त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा, असेही ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकार कृषिप्रश्नी दोन पावले मागे येते, हा अनुभव राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी गटाला आलेला होता. हे सूत्र अतिवृष्टीनंतर शिवसेनेकडून स्वीकारले जात असल्याचे चित्र रविवारच्या दौऱ्यानंतर स्पष्टपणे समोर आले.

हेही वाचा- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाजपच्या दीपोत्सवात चारचाकी, दुचाकी, पैठण्यांची ‘भेट’

कृषिमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांच्यासारखा ‘प्रसिद्धीप्रिय’ मंत्री असल्यामुळे आणि त्यांच्या बोलण्यामुळे शिंदे आणि भाजप गटात ठिणगी पडू शकते, असे लक्षात आल्यानंतर कृषिखात्यावर टीका करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने कृषी खात्याला लक्ष्य केले आहे.

Story img Loader