मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाचा आधार घेत विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीला लक्ष्य केले आहे. व्होटबँकेच्या राजकारणासाठी इंडियाकडून सनातन धर्माचा अपमान केला जातोय, असे अमित शाह म्हणाले.
“त्यांना सत्ता हवी आहे, पण…”
अमित शाह यांनी राजस्थानमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या ‘परिवर्तन यात्रे’ला आज (३ सप्टेंबर) हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना “गेल्या दोन दिवसांपसून मी इंडिया आघाडीचे निरीक्षण करत आहे. त्यांना सत्ता हवी आहे. ते सत्तेसाठी देशाच्या संस्कृतीचा, भारताच्या इतिहासाचा, सनातन धर्माचा अपमान करत आहेत,” असे अमित शाह म्हणाले.
व्होटबँकेचे राजकारण करण्यासाठी सनातन धर्माचा अपमान
“इंडिया आघाडीत काँग्रेस आणि डीएमके हे दोन प्रमुख पक्ष आहेत. या दोन्ही प्रमुख पक्षातील डीएमके पक्षाचे नेते तथा तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे सनातन धर्माचे उच्चाटन करायला हवे, असे म्हणाले. तुष्टीकरण आणि व्होटबँकेचे राजकारण करण्यासाठी त्यांनी सनातन धर्माचा अपमान केला आहे. आज यूपीएचे लोक तसेच काँग्रेस पक्षाचे नेते हे म्हणतात की, मोदी यांचा विजय झाल्यास देशात सनातन धर्माचे राज्य येईल. मात्र सनातन धर्म हा लोकांच्या मनावर राज्य करतो. सनातन धर्म लोकांच्या मनातून काढता येणार नाही,” असेही अमित शाह म्हणाले.
उदयनिधी स्टॅलिन हे काय म्हणाले होते?
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र, अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे शनिवारी (दि. २ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. “सनातन धर्मामुळे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते, त्यामुळे अशा धर्माचे उच्चाटन करायला हवे,” असे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.
मी माझ्या मतावर ठाम- उदयनिधी
या विधानानतर वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता उदयनिधी यांनी काहीशी सावध भूमिका घेतली. मी कोठेही नरसंहार व्हायला हवा, असे म्हणालो नाही, असे उदयनिधी यांनी स्पष्ट केले. मात्र सनातन धर्म हा जात आणि धर्माच्या नावाने लोकांमध्ये फूट पाडतो, या विधानावर मी ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमित मालवीय यांचा गंभीर आरोप
दरम्यान, हे विधान केल्यानंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी उदयनिधी यांच्यावर टीका केली होती. सनातन धर्माची उपासना करणाऱ्या ८० टक्के लोकांचा नरसंहार करायचा आहे, असे उदयनिधी म्हणाल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला. तर डीएमके पक्षाचे सहसचिव तसेच प्रवक्ते सर्वानन अन्नादुराई यांनी, उदयनिधी यांच्या विधानाची मोडतोड करण्यात आली, असे स्पष्टीकरण दिले.