Udhayanidhi Stalin Deputy CM of Tamil Nadu : तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शनिवारी (२८ सप्टेंबर) रात्री उशिरा याबाबत माहिती देण्यात आली. रविवारी दुपारी साडेतीन वाजता उदयनिधी यांनी उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेतली. तर, दोन दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून आलेल्या सेंथिल बालाजी यांनाही मंत्रिमंडळात घेण्यात आलं आहे. काहीच वर्षांपूर्वी राजकारणात आलेले उदयनिधी तमिळनाडूच्या राजकारणात इतके मोठे कधी व कसे झाले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या युवा शाखेचे प्रमुख म्हणून उदयनिधींनी राज्यव्यापी दौरा केला होता. तेव्हा ते प्रसिद्धीझोतात आले. त्याआधीही डीएमकेसाठी ते काम करतच होते. मात्र लोकसभेपूर्वी केलेला दौरा हेच त्यांचं राजकीय पदार्पण मानता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४६ वर्षीय उदयनिधी स्टॅलिन यांनी लोकसभेपूर्वी राज्यव्यापी दौऱ्याद्वारे तरुणांना पक्षाकडे आकर्षित केलं. मात्र, गेल्या वर्षी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीका झाली होती. २ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करताना उदयनिधी यांनी समाजातील विषमता आणि सनातन धर्म यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सनातन धर्माची मलेरिया, डेंग्यू आणि करोना विषाणूशी तुलना केली. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिकाही मांडली. ते म्हणाले, “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं.” उदयनिधींच्या या वक्तव्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते तमिळनाडूमधील भाजपा पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारलं. उदयनिधींनी व्यक्ती व भाषण स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.

हे ही वाचा >> Maharashtra Election : काँग्रेस विधानसभेच्या किती जागा लढणार? मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? रणनिती तयार! जाणून घ्या पाच वर्षांत मोठ्या भावाची जागा कशी घेतली?

‘सनातन’वरील टिप्पणीमुळे सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यामुळे उदयनिधी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकार, द्रमुख खासदार ए. राजा. सीबीआय आणि इतर काही लोकांना नोटीस बजावली. त्यानंतर उदयनिधींनी न्यायालयाकडे दाद मागितली. त्यावर न्यायालयाने म्हटलं की “तुम्ही राज्यघटनेच्या कलम १९(१)(अ) अंतर्गत मिळणाऱ्या अधिकारांचा गैरवापर केला. त्यांचा अवमान केला. आता तुम्ही कलम ३२ नुसार तुम्हाला मिळालेल्या दाद मागण्याच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करता? तुम्ही जे काही म्हणालात, त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहिती नव्हतं का? तुम्ही कुणी सामान्य व्यक्ती नाही आहात. तुम्ही एक मंत्री आहात. तुम्हाला अशा गोष्टींच्या परिणामांची कल्पना असायला हवी”.

हे ही वाचा >> One Nation One Election: १९६७..इंदिरा गांधींची पहिली तर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची शेवटची निवडणूक; ५७ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

राजकारणात सावध सुरुवात

तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये उदयनिधी स्टॅलिन हे चेपॉक तिरुवल्लीकेनी या द्रमुकचा बालेकिल्ला असलेल्या सुरक्षित मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी भाजपा व अण्णाद्रमुक पक्षावर जोरदार टीका केली. या पक्षांमुळे तमिळनाडूची प्रगती कशी खुंटली हे सांगण्यावर उदयनिधींनी भर दिला. द्रमुक पक्षाने ती निवडणूक जिंकली व एम. के. स्टॅलिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. काही महिन्यांनी स्टॅलिन यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी उदयनिधींना देखील सामावून घेतलं. उदनिधींना युवक कल्याण व क्रीडा विकास मंत्रीपद दिलं.

हे ही वाचा >> Chirag Paswan : उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसला नवं आव्हान; चिराग पासवान यांनी आखली मोठी योजना

तमिळनाडूच्या राजकारणात लोकप्रियता

मंत्री झाल्यानंतर उदयनिधी हळूहळू राज्यातील द्रमुक पक्षाचा लोकप्रिय चेहरा बनू लागले. द्रमुकच्या आयटी सेलने त्यांची समाजातील प्रतिमा उंचावण्याचं व जाहिरातीचं काम केलं. मतदारसंघावर पकड, विकासकामं व चित्रपट कारकिर्दीमुळे ते अधिक लोकप्रिय होऊ लागले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘मामन्नन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाद्वारे त्यांनी सामाजिक विषयाला हात घालत लोकांची वाहवा मिळवली होती. तसेच तमिळनाडूमधील ते प्रमुख चित्रपट निर्मिती कंपनी चालवत आहेत.

हे ही वाचा >> सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!

एम. के. स्टॅलिन यांचं मुलासाठी वडिलांपेक्षा वेगळं राजकीय धोरण

द्रमुकचे दिवंगत पक्षप्रमुख व तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी सर्वप्रथम कुटुंबातील लोकांसाठी पक्षाचे दरवाजे उघडले होत. त्यांनी त्यांची तिन्ही मुलांना (स्टॅलिन, एम. अलागिरी व मुलगी कनिमोळी) राजकारणात आणलं. मात्र करुणानिधी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असेपर्यंत, राजकारणात सक्रीय असेपर्यंत त्यांनी तिन्ही मुलांना प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. स्टॅलिन यांनी मात्र वडिलांच्या विपरित धोरण राबवलं आहे. ते त्यांच्या मुलाला राजकारणात एकेक पायरी वर नेत आहेत. यामुळे त्यांच्यावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्टॅलिन यांच्यावर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला आहे.

हे ही वाचा >> मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा

उदयनिधींना घरातून पूर्ण पाठिंबा

तसेच द्रमुक पक्षाची सूत्रे आणि तमिळनाडूची सत्ता पूर्णपणे स्टॅलिन यांच्या हातात आहे. त्यामुळे उदयनिधी या नव्या नेतृत्वाला पक्षातून विरोध होण्याची शक्यता नाही. करुणानिधींचा वारसा मिळावा यासाठी स्टॅलिन व त्यांचे बंधू अलागिरी यांच्यात दीर्घकाळ संघर्ष झाला. मात्र भावाचा विरोध हाणून पाडत स्टॅलिन यांनी त्यांनी पक्ष व सत्ता मिळवली. उदयनिधींच्या बाबतीत तसा कोणाचा विरोध नाही. अलागिरी यांचा मुलगा दयानिधी व उदयनिधींचे संबंध चांगले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udhayanidhi tamil nadu deputy cm command on dmk successor of mk stalin asc