भाजपाच्या दिग्गज नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकारच्या दारू धोरणावरून नाराजी व्यक्त करत, स्वत:च्या सरकारविरोधातच बंड पुकारल्याचे दिसत आहे.
निवारीच्या ओरछा जिल्ह्यातील समर्थकांशी बोलताना उमा भारती म्हणाल्या, मी विचारच करू शकत नाही की, आमच्या सरकारमध्ये दारूमुळे समस्या निर्माण होईल. आम्ही दिल्लीत, छत्तीसगडमध्ये याचा विरोध करत होतो. मात्र त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आपण इथे निर्माण केली आहे. कोणतीही मान, मर्यादा ठेवली नाही. ओरछामधील दारू दुकानाचा उल्लेख करत उमा भारती म्हणाल्या की, या दुकानाची मर्यादा तर रस्त्यापासून ५० मीटरचीही नाही. तसेच, भोपाळमधील करोंद चौकातील दारूच्या दुकानाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, एकच संरक्षक भिंतीला लागून एका बाजूस मुलींची शाळा आणि दुसऱ्या बाजूस दारूचे दुकान होते. दारूच्या दुकानास महसुलाचे उद्दिष्ट दिले जाते, कारण यासाठी आपल्याला सर्वात सोपी दारूच वाटत आहे. जास्त महसुलासाठी दुकानदारांना पाहिजे तिथे दुकान सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे.
याशिवाय, उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने हा विचार नाही केला की मंदिराच्या दारासमोर दुकान सुरू केलं जात आहे. काय गरज आहे अशा महसुलाची? इथे लोकांना गंगाजल वाटलं पाहिजे, गायीची दूध व छाछ पिण्यास दिली पाहिजे, मात्र तुम्ही इथे दारू पाजत आहात. तर मग काय कामाची रामाची भक्ती? असा प्रश्नही उमा भारती यांनी विचारला आहे.
याचबरोबर, भाजपा राम भक्तीपासून दूर होत आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यानंतर उमा भारती यांनी यावर उत्तर देताना, तुम्ही व्ही.डी शर्मा यांना विचारा, या प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही. असं त्यांनी सांगितलं.