यवतमाळ – जिल्ह्यात लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमरखेड आणि वणी विधानसभा मतदारसंघात बंडखोरांमुळे महाविकास आघाडीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. तर दिग्रस, राळेगाव मतदारसंघात आजी-माजी मंत्री एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत.
उमरखेडमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यापुढे काँग्रेसचे बंडखोर माजी आमदार विजय खडसे यांनी शड्डू ठोकले. महायुतीचे भाजप उमेदवार किसन वानखेडे यांच्यापुढे भाजपचे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी मनसेची उमेदवारी घेत आव्हान निर्माण केले. येथे महाविकास आघाडी आणि महायुतीतील उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहेत. तर त्यांच्यापुढे दोन अनुभवी माजी आमदारांचे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे साहेबराव कांबळे आणि महायुतीचे किसन वानखेडे हे दोघेही सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहेत. त्यांचा राजकारणातील अनुभव माजी आमदारांपेक्षा कमी आहे. शिवाय काँग्रेस आणि भाजपमध्येही दोन गट पडल्याने नवा, जुना या वादात ही निवडणूक उमरखेड मतदारसंघात अधिक चुरशीची होणार आहे.
हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत थेट, दोन जागी ‘बहुरंगी’ लढत
दिग्रस मतदारसंघात महायुतीचे संजय राठोड आणि महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. संजय राठोड हे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. तर माणिकराव ठाकरे यांनीही काँग्रेस सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. दिग्रस हा बंजाराबहुल मतदारसंघ यावेळी येथे थेट लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडी, प्रहार या पक्षाकडे वळणारी मते आणि कुणबी, मराठा मतांचे विभाजन हा महत्वाचा घटक ठरणार आहे. सोबतच अनुसूचति जाती, जमाती, अल्पसंख्याक मते निर्णायक ठरणार आहेत. काट्याची टक्कर म्हणून दिग्रस मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी १९९५ मध्ये भारीप बहुजन महासंघाचे उमदेवार मखराम पवार यांनी माणिकराव ठाकरे यांना काट्याची टक्कर दिली होती. या निवडणुकीत माणिकराव ठाकरे केवळ दोन हजार ९६८ मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर २००४ मध्ये संजय राठोड यांनी अनुभवी माणिकराव ठाकरे यांचा तब्बल २१ हजार ५४२ मतांनी पराभव केला होता. या पराभवानंतर २० वर्षांनी माणिकराव ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरले असून या निवडणुकीतील जय-पराजयावर ठाकरे यांची भावी राजकीय वाटचाल ठरणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – बेलापूरमध्ये अन्य पक्षातील नेत्यांना गळाला लावण्यावर भाजपचा भर
राळेगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. वसंत पुरके आणि महायुतीचे उमेदवार प्रा. डॉ. अशोक उईके यांच्यात थेट लढत होईल. प्रा. वसंत पुरके आघाडी सरकारमध्ये विविध विभागाचे कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. तर महायुतीचे प्रा. डॉ. अशोक उईके २०१९ मध्ये काही महिने आदिवासी विकास मंत्री होते. त्यामुळे या मतदारसंघात दोन माजी मंत्र्यांमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसचे वसंत पुरके यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातील किरण कुमरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आव्हान निर्माण केले आहे. अन्य दोन उमदेवारांनीही पुरके यांच्या वाटेत अडथळे निर्माण केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी येथे कोणती व्युहरचना आखते याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.