चंद्रशेखर बोबडे
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षबांधणीचा संकल्प करण्यासाठी आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात पक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या विजयाऐवजी मोदी यांचेच गुणगाण केल्याने व त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प करा, असे आवाहन केल्याने ही जागा सेनाच लढणार की भाजपला सोडणार या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला. येथील विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे युतीच्या जागा वाटपाच्या प्राथमिक सूत्रानुसार रामटेकची जागा शिंदे गटालाच सुटणार असा अंदाज आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने या जागेवर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला शिवसंकल्प मेळावा महत्त्वाचा होता. मेळाव्याचा उद्देश लक्षात घेता शिंदे पक्ष मजबुतीचा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाचा संकल्प सोडतील असे वाटत होते. पण त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प करा, त्यादृष्टीने कामाला लागा, असे सांगितले. राम मंदिराचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले, २०२४ मध्ये मोदीच निवडून येणार, मोदींच्या विरोधात तयार झालेल्या इंडिया आघाडीत बिघाड झाला, असे ते म्हणाले.
हेही वाचा… शिंदे गटाचे कोल्हापूरमध्ये अधिवेशन, दोन्ही जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान
सभा शिवसेनेची आहे की भाजपची असा प्रश्न पडावा इतका प्रभाव शिंदेंच्या भाषणावर मोदींचा होता. बहुतांश वेळ त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात व त्यानंतर मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून कसे काम करतो हे सांगण्यात खर्ची झाला. पण रामटेकची लोकसभेची जागा शिवसेनाच (शिंदे गट) लढणार हे त्यांनी ठासून सांगितले नाही. फक्त विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी सुरू केलेल्या जनसंपर्काचा उल्लेख त्यांनी केला. मोदींना पुन्हा पंतप्रधान करा म्हणजे महायुती जो उमेदवार देईल तो निवडून द्या (म्हणजे भाजपचा) असे तर शिंदे यांच्या म्हणण्याचा अर्थ नाही ना? अशी चर्चा आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
हेही वाचा… जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्याबद्दलचा संशय कायम
दरम्यान, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार म्हणाले, शिंदे यांच्या भाषणातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख त्यांच्या कामगिरीशी संबंधित आहे, रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या घोडदौडीसंदर्भात शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढणार यात काही शंका नाही. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत शिवसेना मताधिक्यांनी जिंकली असल्याने ही जागा सेनाच लढणार याबाबत आम्हाला खात्री आहे. शिंदे यांच्या भाषणावर मित्र पक्ष भाजपकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही.