India Alliance Future: “इंडिया आघाडी संपुष्टात येणार नाही किंवा ती कमकुवतही होणार नाही, उलट ती आणखी ताकदीने पुढे येईल”, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादिका नीरजा चौधरी यांच्याशी बोलताना दिली. इंडिया आघाडी आता उरली नाही, अशा चर्चा सुरू असताना अखिलेश यादव यांची ही प्रतिक्रिया वेगळी वाटते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्षाचे भवितव्य काय? यापेक्षा इंडिया आघाडीचे काय होणार? याचीच अधिक चर्चा होत आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल लागत असताना भाजपाने आघाडी घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक मिम शेअर करत आघाडीतील बिघाडीवर पहिल्यांदा बोट ठेवले होते. “आपसात लढा आणि मरा”, अशा आशयाचे मिम त्यांनी शेअर केले होते.

इंडिया आघाडीचे भवितव्य काय? विरोधकांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार? या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादिका नीरजा चौधरी यांनी सविस्तर लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी विरोधकांच्या राजकारणाचा धांडोळा घेतला. त्यांनी लिहिले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत द्रमुक पक्ष वगळता सर्व प्रमुख पक्षांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला. आता असे दिसत आहे की, अखिलेश यादव आघाडी वाचवू पाहत आहेत. अखिलेश यादव म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये आम्ही (काँग्रेस) एकत्र निवडणूक लढवू. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागा आहेत. आम्ही काही जागा वाटून घेऊ शकतो, उरलेल्या जागा मित्रपक्षांना देऊ शकतो. जिकंण्याची क्षमता आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी कोण सर्वोत्तम आहे, असे काही निकष लावता येऊ शकतात.”

मित्रपक्षांशी गुंतागुंतीचे संबंध

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या जोडगोळीने केलेल्या कामगिरीमुळे भाजपाला बहुमताच्या आकड्याच्या खाली २४२ जागांवर अडविण्यात इंडिया आघाडीला यश आले. काँग्रेसच्या खासदारांची संख्या ९९ वर पोहोचल्यामुळे काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची आशा पल्लवीत झाली.

राज्यांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसला इंडिया आघाडीची फारशी गरज नाही, असेही नीरजा चौधरी म्हणाल्या. बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरिस विधानसभा निवडणूक असून तिथे काँग्रेसची आरजेडीशी आघाडी आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाशी आघाडी असून तिथे २०२६ मध्ये निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाशी काँग्रेसची मैत्री आहेच. काँग्रेसची खरी अडचण आहे ती पश्चिम बंगालमध्ये. पुढील वर्षी बंगालमध्ये निवडणूक आहे. मागच्या वर्षी लोकसभेलाही पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि टीएमसीची आघाडी झाली नव्हती. ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच २०२६ ला पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा कली आहे.

पश्चिम बंगालमध्ये या दोन पक्षात सूत जुळत नाहीत. त्यातच आता राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये यात्रा काढणार असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे डाव्या पक्षांशीही गुंतागुंतीचे संबंध आहेत. केरळमध्ये काँग्रेस डाव्यांच्या विरोधात आहे. तर पश्चिम बंगालमध्ये त्यांनी डाव्यांशी आघाडी केली आहे. पुढच्या वर्षी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये निवडणूक होणार असल्यामुळे काँग्रेसची कसोटी लागणार आहे.

काँग्रेसचे आम आदमी पक्षाशीही गुंतागुंतीचे संबंध आहेत. दिल्लीच्या निकालानंतर ‘आप’च्या नेत्यांनी म्हटले की, काँग्रेसला भाजपापेक्षा अरविंद केजरीवाल यांनाच हरविण्यात अधिक रस होता. दिल्लीत ‘आप’चा पराभव झाल्यानंतर काँग्रेसची नजर आता पंजाबवर आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी दावा केला आहे की, ‘आप’चे ३२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या इंडिय अगेंस्ट करप्शन या चळवळीपासून काँग्रेस आणि ‘आप’ यांच्यात तणावपूर्ण संबंध आहेत. या आंदोलनामुळेच यूपीएचे सरकार गेले आणि नरेंद्र मोदी यांचा २०१४ साली उदय झाला, असे मानले जाते. काँग्रेसच्या अधोगतीला ‘आप’ जबाबदार असल्याचे काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना वाटते.

Story img Loader