दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हाती घेऊन राज्यातील डावे, पुरोगामी पक्ष प्रागतिक पक्षाच्या झेंड्याखाली पुन्हा एकदा एकवटले आहेत. यानिमित्ताने राज्याच्या राजकारणात रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी (रिडालोस) या १५ वर्षांपूर्वी एकत्रित असलेल्या डाव्या, पुरोगामी पक्षांची एकजूट होत आहे. अपवाद वगळता प्रभावी चेहऱ्यांची उणीव असल्याने ही नवी आघाडी राजकारणात कितपत झेप घेणार याची चर्चा आहे.

राज्याच्या राजकारणात चार प्रमुख पक्षांचा बोलबाला राहिला. काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आधीपासूनच राज्यातील सत्तेचा पक्ष अशी ओळख आहे .तर गेल्या ३० वर्षांमध्ये शिवसेना आणि भाजप यांनीही मोठा प्रभाव निर्माण केला आहे. राज्याच्या विधिमंडळात आता भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्याच्या पाठोपाठ शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे स्थान राहिले. गेल्या वर्षभरात राज्याचे राजकारण पूर्णतः बदलले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली आहे. त्यांचीच पायवाट तुडवत अलीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून उपमुख्यमंत्री पद मिळवले आहे. परिणामी राज्यात आता भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रीय काँग्रेस असे सहा प्रमुख पक्ष पक्ष दिसत आहेत. राज्यातील डाव्या व पुरोगामी पक्षांचा प्रभाव उत्तरोत्तर कमी होत चालला आहे.

हेही वाचा… निधीवाटपावरून वाद सुरू झाले मंत्री व विरोधी पक्षनेते समोरासमोर

नव्या मंचाचा प्रवेश

या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेस आणि भाजप शिवसेना यांच्या राजकारणापासून चार हात दूर राहत डाव्या व पुरोगामी १३ पक्षांनी प्रागतिक पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यात जनजागृती सभा, जेलभरो, मंत्रालयावर मोर्चा या धडक कार्यक्रमाद्वारे आपले अस्तित्व ठळक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पहिल्या बैठकीस शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी महाराष्ट्र, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन पार्टी, रिपाई (सेक्युलर) पार्टी व श्रमिक मुक्ती दल हे १३ घटक पक्ष सहभागी झाले होते. अशोक ढवळे, माजी खासदार राजू शेट्टी, भालचंद्र कांगो, आमदार जयंत पाटील, आमदार अबू आजमी, आमदार हितेंद्र ठाकूर, उदय नारकर, सुभाष लांडगे, प्रा. सुभाष जाधव, प्रताप होगाडे, अनिस अहमद, प्रभाकर नारकर, ॲड.डॉ. सुरेश माने आदींचा आघाडीत समावेश आहे. यानिमित्ताने राज्याच्या राजकारणात नव्या मंचाचा प्रवेश झाला आहे.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या घराणेशाहीवर पक्षातूनच नाराजीचा सूर

‘रिडालोस’ची पुनरावृत्ती

प्राकृतिक पक्षांची स्थापना म्हणजे राज्यात पुन्हा एकदा रिडालोसची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. सन २०१९ साली राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी आघाडी स्थापन करण्यात आले होती. तत्कालीन उभय काँग्रेसची आघाडी आणि भाजप, शिवसेना युतीला पर्याय म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड) ,राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (धर्मनिरपेक्ष), समाजवादी पक्ष , स्वाभिमानी पक्ष, छात्रभारती आदी १४ राजकीय पक्ष यांची ही आघाडी जन्माला आली होती. त्यावेळी रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला होता. राज्यातील सर्व २८८ जागावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. सुरुवातीला चांगली हवा केलेल्या या आघाडीचे चित्रपट अभिनेता संजय दत्त, क्रिकेटपटू विनोद कांबळे स्टार प्रचारक होते. प्रकाश आंबेडकर यांनी तेव्हा या आघाडीपासून दूर राहून भारिप, बहुजन महासंघ, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, पीस पार्टी या छोट्या पक्षांची चौथी आघाडी बनवली होती. आताही ते या नव्या आघाडीत दिसत नाहीत. २०१९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी रिडालोसचा पाठिंबा घेऊन अपक्ष लढून लोकसभा निवडणुकीतला पहिला विजय मिळवला होता. पुढे राजू शेट्टी यांनीही भाजपला पाठिंबा दिला. रामदास आठवले यांनीही तेच केले. आता शेट्टी पुन्हा या प्राकृतिक पक्षात असल्याने त्यांचा नवा राजकीय प्रवास या माध्यमातून सुरू झाला आहे. हळूहळू रिडालोसचे अस्तित्व क्षीण झाले. आता तर रिडालोसचा राजकीय संदर्भ कोणी फारसा घेताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टी वगळता अन्य प्रभावी चेहरा तूर्तास प्राकृतिक पक्षात दिसत नाही. यामुळे रिडालोसच्या धर्तीवर स्थापन झालेला प्रागतिक पक्षाला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागेल असे दिसत आहे.

हेही वाचा… जयंत पाटील यांच्या खुलाशानंतरही कार्यकर्त्यांमध्ये संशय कायम

प्रस्थापित पक्ष छोट्या पक्षांना जुमानत नसल्याने अनेक छोटे पक्ष एकत्र येऊन राज्यात प्रागतिक पक्ष ही नवी आघाडी तयार केली आहे. हा मंच काही नवा नाही. त्यांनी यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण सत्ता स्थापन झाल्यानंतर घटक पक्षांना डावलले होते. याची किंमत त्यांना मोजायला लावली जाईल. जन आंदोलनातून मंचाची ताकद दाखवून देवू. – राजू शेट्टी , माजी खासदा

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under the banner of progressive party small political parties like progressive left parties are united print politics news asj