नवी मुंबई : भाजपच्या ताब्यात असलेल्या नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन जागांपैकी किमान एक जागा तरी पदरात पडावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील स्थानिक पुढाऱ्यांनी राज्य सरकारमार्फत घेण्यात येणाऱ्या काही निर्णयावर आपल्याच पक्षाची कशी छाप आहे हे बिंबवताना भाजपवर मात्र कुरघोडी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविल्याचे चित्र सध्या शहरात दिसू लागले आहे.

नवी मुंबई, पनवेल, उरण पट्ट्यातील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे तसेच शहराच्या जमिनी ‘सिडको मुक्त’ करण्यासंबंधी सुरु झालेल्या हालचालींचे संपूर्ण श्रेय आपल्या पक्षालाच मिळावे अशाप्रकारचे प्रसिद्धी अभियानच शिंदेगटाच्या नेत्यांनी सुरु केले आहे. विशेष म्हणजे श्रेय मिळविण्याच्या या स्पर्धेत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांचाही उल्लेख शिवसेना (शिंदे) नेते टाळू लागल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

हेही वाचा – महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांचा अलिबागच्या जागेवर दावा

देशातील भाजप नेते म्हणतील ती पूर्वदिशा या न्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष वाटचाल करत असताना राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये मात्र भाजप आणि शिवसेनेत (शिंदे) कमालिची धुसफूस असल्याचे चित्र वारंवार पहायला मिळते. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात या दोन पक्षांमध्ये विळ्याभोपळ्याचे नाते पहायला मिळते. भाजपचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक आणि शिंदे यांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांमधील हाडवैर जाहीर आहे. लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदे यांच्या पक्षाला सुटल्यानंतर नाईक यांच्या गोटातील नाराजी जाहीरपणे दिसून आली होती. या नाराजीचा परिणाम काही प्रमाणात महायुतीच्या मतदानावरही दिसून आला. सद्यस्थितीत ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे या सलग दोन वेळा निवडून आल्या आहेत, तर ऐरोली मतदारसंघावर नाईक कुटुंबियांचा सुरुवातीपासून वरचष्मा राहिला आहे. अशा परिस्थितीत या दोनपैकी किमान एक जागा तरी आपल्याला मिळावी यासाठी शिंदे यांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे.

सरकारी निर्णयावरुन भाजपची कोंडी ?

ऐरोली, बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार असल्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात या दोन्ही जागांवर या पक्षाचा दावा कायम आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघावर संदीप नाईक यांनी दावा केल्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद येथे टोकाला पोहचल्याचे दिसून येते. असे असताना हा मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळावा यासाठी या पक्षाचे स्थानिक नेते आग्रही आहे. त्यामुळे गेल्या पंधरवड्यात नवी मुंबईसंबंधी घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचे श्रेय आपल्याच पक्षाला मिळावे यासाठी शिवसेनेचे (शिंदे) स्थानिक पुढारी आक्रमक भूमिका घेताना दिसू लागले आहे. नवी मुंबई, पनवेल-उरण पट्ट्यातील स्थानिक ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा प्रश्न खासदार नरेश म्हस्के यांनी सरकार दरबारी आग्रहाने नेला आणि काही बैठकानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास हिरवा कंदील दाखविला. म्हस्के यांच्या बैठकीनंतर भाजपच्या आमदारांनी यासाठी स्वतंत्र्य बैठकीचा आग्रह धरला. तेव्हाच या मुद्द्यावरुन दोन पक्षांतील मतभेद उघड झाले होते. हा निर्णय होताच याचे श्रेय घेण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शहरभर फलकबाजी केली. ही फलकबाजी करताना भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या छायाचित्रालाही या मंडळींनी स्थान दिले नाही. ऐरोली, बेलापूर या दोन्ही मतदारसंघातील भाजप आमदारांचे साधा उल्लेखही शिवसेनेचे नेते टाळत असून यामुळे भाजपच्या गोटात कमालिची अस्वस्थता आहे.

हेही वाचा – राहुल गांधींची भेट, पवारांचे डावपेच; साखरपट्टा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शहरातील सिडकोने बांधलेल्या धोकादायक इमारतींच्या पुर्नविकासात अनेक अडथळे होते. मुख्यमंत्र्यांनी हे अडथळे दूर करण्यासाठीही निर्णायक पावले उचलली आहेत. राज्य सरकारच्या निर्णयांमध्ये कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही. परंतु मुख्यमंत्री अतिशय धडाडीने शहराच्या हिताचे निर्णय घेत असतील तर ते नवी मुंबईकरांपुढे मांडायला हवेच. – किशोर पाटकर, संपर्कप्रमुख शिवसेना (शिंदे)