बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडली आहे. ‘भाजपा जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय,’ असा आरोप करत नितीश कुमारांनी युती तोडली. त्यानंतर नितीश कुमारांनी राजदसमवेत सत्ता स्थापन केली. बिहारमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बिहार आज ( २३ सप्टेंबर ) दौऱ्यावर आले आहेत. यावेळी अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“नितीश कुमार स्वार्थी राजकारणी आहेत. त्यांनी जॉर्ज फर्नांडिस, भाजपा आणि अनेकांना धोका दिला आहे. एक दिवस लालू प्रसाद यादव यांचा हात सोडून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसतील. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह त्यांनी समता पक्ष स्थापन केला. मात्र, जेव्हा जॉर्ज फर्नांडिस हे आजारी पडले, त्यावेळी नितीश कुमार यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. शरद यादव, भाजपा, जीतनराम, रामविलास पासवान यांना धोका दिला. आता पंतप्रधान पदाच्या लालसेपोटी भाजपा दुसऱ्यांदा फसवून लालू प्रसाद यादव यांच्यासह युती केली आहे,” अशा शब्दांत नितीश कुमार यांचा अमित शाह यांनी समाचार घेतला. ते एका सभेला संबोधित करत होते.
हेही वाचा – भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उधळले करोडो रुपये; काँग्रेसने किती केला खर्च?
“मी बिहारमध्ये आल्याने लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या पोटात दुखत आहे. भांडण लावण्यासाठी मी येत असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, बिहारच्या विकासासाठी आम्ही आलो आहे,” असे प्रत्युत्तर अमित शाह यांनी दिलं आहे.
हेही वाचा – ‘तो’ काय बाबा मोठ्ठा माणूस, आम्हाला राहुलच हवेत; शशी थरुरांकडे केरळमधल्या नेत्यांचीच पाठ
“विधानसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानंतरही नितीश कुमारांना बिहारचे मुख्यमंत्री केले. मात्र, तुम्ही आमचा विश्वासघात केला. बिहारला आता विकासाची गरज आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता तुम्हाला धडा शिकवेल. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ,” असा निर्धार अमित शाह यांनी केला आहे.