पुणे : ‘शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले,’ असा जोरदार हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पवार यांच्यावर चढवला, तर ‘महाविकास आघाडी ‘औरंगजेब फॅन क्लब’ असून, त्याचे अध्यक्ष श्रीमान उद्धव ठाकरे आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अधिवेशनात अमित शहा यांनी पवार, ठाकरे आणि राहुल गांधींचा समाचार घेतला. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्यासाठी केलेल्या कामांची आणि निधीची यादी सादर करताना केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना, ‘शरद पवार यांनी दहा वर्षांत काय केले, याचा हिशोब द्यावा,’ असे आव्हान दिले. ‘केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांना पुण्यातील कोणत्याही चौकात भाजपचा दहा वर्षांतील हिशोब देतील,’ असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>न्यायालयाच्या नामांतरासाठी केंद्राला पुन्हा प्रस्ताव; ‘ बॉम्बे हायकोर्ट’चे ‘मुंबई उच्च न्यायालय’ नामांतर करण्याची मागणी

‘राज्यात जेव्हा पवार आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो. राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आला. भाजप पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यात भाजपची सत्ता हवी,’ असा दावाही शहा यांनी केला.

हिंदूंचा अपमान सहन करणार नाही’

‘भाजपची हिंदुत्वाची विचारधारा कायम आहे. मात्र, हिंदूंना दहशतवादी ठरविले जात आहे. विशाळगडावरील शिवप्रेमींना दहशतवादी ठरविण्यात येत आहे. राहुल गांधी हिंदूंना हिंसक म्हणत आहेत. त्यामुळे यापुढे हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही,’ असे फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union home minister amit shah criticizes sharad pawar over corruption amy