देशभरात आज संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा होतो आहे. गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये संक्रांत असल्याने पतंग उडवण्यास सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आज गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्यासह पतंगबाजीचा आनंद लुटला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधल्या अहमदाबाद या ठिकाणी पतंग महोत्सव आयोजित केला होता. या पतंग महोत्सवात सहभागी होत अमित शाह यांनी पतंगबाजीचा आनंद लुटला. अमित शाह यांचे पतंगबाजीतले डावपेचही या निमित्ताने उपस्थितांना पाहण्यास मिळाले. त्यांच्या पत्नीही त्यांच्यासमवेत होत्या. पतंग उत्सवात येण्याआधी अमित शाह यांनी जगन्नाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्यासह दरियापूर या ठिकाणीही पतंग उडवला.
संसदीय मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत अमित शाह पतंग उडवतात
दरवर्षी मकरसंक्रांत हा सण आमित शाह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन साजरा करतात. आजही अमित शाह विविध ठिकाणी गेले होते. या कार्यकर्त्यांसोबतही अमित शाह यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. रविवारी गृहमंत्री अमित शाह गांधी नगर येथील उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या बोडी आदराज गावातल्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
करोनानंतर दोन वर्षांनी संक्रांतीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो आहे. यावर्षी लोकांमध्ये पतंगबाजीचा एक वेगळाच उत्साह दिसून आला. लहान मुलं असतील किंवा तरूण असतील प्रत्येकचजण पतंग उडवण्यात सहभागी झालेला पाहणयास मिळाला. आकाशात पतंगांची गर्दी होती तसंच काटाकाटीही पाहण्यास मिळाली. फिल्मी गाण्यांवर लोक नाच करत उत्सव साजरा करत होते.
आज आभाळ मोकळं होतं त्यामुळे पतंग उडवण्यात मजा येत होती. यावर्षी पतंग काही प्रमाणात महाग होते. मात्र त्याचा परिणाम काहीही झाला नाही. लोकांनी उत्साहाने पतंगांची खरेदी केली आणि ते आनंदाने पतंग उडवताना दिसले.