नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाराजीचा फटका बसल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते दक्ष झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पक्षाच्या विभागीय बैठकीसाठी मंगळवारी नवी मुंबईत येणार असून या दौऱ्यादरम्यान ते कोपरखैरणे येथील संघाच्या शाखेलाही भेट देणार आहेत. कोपरखैरणे येथे एका छोट्याशा गल्लीबोळात असलेल्या या शाखेत अमित शहा जवळपास तासभर संघ प्रचारकांशी चर्चा करणार असल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचे राज्यात दौरे सुरू आहेत. गेल्या पंधरवड्यात शहा यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचे दैारे करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मंगळवारी दुपारनंतर शहा नवी मुंबईतील वाशी येथे कोकण, ठाणे आणि पालघर विभागातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठया पराभवाचे तोंड पहावे लागले. या पराभवामागील कारणांचा शोध घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समन्वय उत्तम राहील अशा स्वरूपाची पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे. संघाकडूनही काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांची विधानसभा संयोजक अशी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या दौऱ्यात शहा यांची कोपरखैरणे येथील एका गल्लीत असलेल्या संघ शाखेला दिली जाणारी भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
शहा यांच्या ठरविण्यात आलेल्या दौऱ्यानुसार कोकण प्रांतातील प्रमुख संघ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत किमान तासभर शहा चर्चा करणार असल्याचे समजते. मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता शहा या संघ कार्यालयात पोहोचतील असे नियोजन करण्यात आले आहे. यानंतर पावण ेआठपर्यंत ते याच कार्यालयात थांबतील असे नियोजन आहे. त्यानंतर शहा यांचा ताफा मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहाच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. याच ठिकाणी ते वास्तव्य करतील आणि बुधवारी दिल्लीच्या दिशेने रवाना होतील.
महापालिकेची धावाधाव
वाशी येथील सिडको सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शहा सायंकाळी साडेसात वाजेपर्यत असणार आहेत. त्यानंतर याच ठिकाणी भोजन करून वाशी येथील प्रमुख रस्त्याने शहा यांचा दौरा कोपरखैरणे येथे निघणार आहे. वाशी ते कोपरखैरणे येथील मुख्य रस्ता हा अतिशय वर्दळीचा मानला जातो. सायंकाळी वर्दळीच्या वेळेत याच मार्गावरून शहा यांचा ताफा निघणार असल्याने वाशी-कोपरखैरणेकरांचा प्रवास मंगळवारी जिकिरीचा ठरण्याची चिन्हे आहेत.
जुन्या शाखेला भेट
ठाणे, डोंबिवलीच्या तुलनेत नवी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाळेमुळे फारशी खोलवर गेल्याचे पाहायला मिळाले नाही. मंगळवारी अमित शहा ज्या संघ शाखेला भेट देणार आहेत ती शाखा साधारण १९८५-८७ च्या सुमारास सुरू झाली. सिडकोने अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी बांधलेल्या २५० ते ३०० चौरस फुटांच्या पत्र्यांचे एक घर तेव्हा संघाने विकत घेतले होते. तेथेच ही शाखा सुरू करण्यात आली. पुढे २००८च्या सुमारास या घराची तळ अधिक दोन मजले अशी पुनर्बांधणी करण्यात आली. त्या वेळी संघाचे विभाग कार्यावह नंदकुमार जोशी, मोहन ढवळीकर, सतीश निकम, जयचंद मोरे अशा काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवर संघाची नवी मुंबई विभागाची जबाबदारी होती. साधारपणे २०१० नंतर संघाचे नवी मुंबईतील कार्य विस्तारत गेले. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर संघाची मुख्य शाखा सीबीडी येथील आर्टिस्ट व्हिलेज येथे हलविण्यात आली आहे.