अविनाश कवठेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षाच्या ‘बी फॉर बारामती’ मोहिमेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा बारामतीच्या मैदानात उतरणार आहेत. दोन महिन्यांतील त्यांचा हा दुसरा दौरा भाजप पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे बारामतीचा बालेकिल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घेरण्यासाठी आक्रमक रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदार संघ भाजपने गांभीर्याने घेतल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्या दृष्टीने भाजपने गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील सोळा लोकसभा मतदार संघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये पुण्यातील बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात सीतारामन यांनी बारामती लोकसभा दौरा केला होता. पक्षाची संघटनात्मक बांधणी या दौऱ्याच्या निमित्ताने करण्यात आली होती. आता त्या पुन्हा बारामतीच्या मैदानात येणार आहेत. त्यामुळे मिशन ‘बी फॉर बारामती’ यशस्वी करण्यासाठी भाजपने गांभीर्याने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल शुक्रवारपासून (११ नोव्हेंबर) बारामतीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये केंद्रीय नेते येणार असल्याने दौऱ्याचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा : बालविवाह रोखण्यासाठी “ती” भारत जोडो यात्रेत; “लेक लाडकी”चा सामाजिक संदेश

निर्मला सीतारामन यांनी गेल्या दौऱ्यात संघटन मजबूत करण्यास प्राधान्य दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची सहकार क्षेत्रातील घट्ट वीण लक्षात घेऊन या वेळी सहकार क्षेत्रावर भाजप नेत्यांकडून लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. त्या दृष्टीने प्रल्हादसिंग पटेल सहकार क्षेत्रातील काही तज्ज्ञांबरोबरही चर्चा करणार आहेत. बारामती लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या विविध विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचे मेळावेही आयोजित करण्यात आले आहेत. लोकसभा आणि विधानसभा सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. त्यानंतर भोर, पुरंदर विधानसभा मतदार संघात शेतकरी आणि महिला बचत गटाच्या मेळाव्याला प्रल्हादसिंग पटेल उपस्थित राहणार आहेत. इंदापूर आणि दौंड येथे कार्यकर्ता मेळावा प्रल्हादसिंग पटेल घेणार आहेत. या दौऱ्यामुळे भाजप बारामतीचा गड हस्तगत करण्यासाठी गंभीर झाल्याचे चित्र दिसून येत असून बारामती लोकसभा मतदार संघ आणि सीतारामन, प्रल्हादसिंग पटेल यांचा बारामती दौरा चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nirmala sitaraman will visit baramati for bjp mission loksabha election sharad pawar supriya sule print politics news tmb 01