Nitin Gadkari Meets Hanuman Beniwal : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते आपल्या भाषणांमधून तरुण आणि शाळकरी मुलांना चांगला सल्लाही देतात. सध्या गडकरींचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते एका खासदाराच्या मुलाला राजकारणात न येण्याचा सल्ला देताना दिसून आले. त्यांच्या या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राजस्थानच्या नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हनुमान बेनीवाल यांच्या मुलाचा २५ मार्च रोजी वाढदिवस होता. दिल्लीतील एका आलिशान हॉटेलमध्ये खासदार महोदयांनी मुलाचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपाचे खासदार उपस्थित होते. यावेळी गडकरींनी बेनीवाल यांचा मुलगा आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तुला मोठे झाल्यावर काय व्हायचं आहे, असा प्रश्नही त्यांनी बर्थडे बॉयला विचारला. “काहीही हो…; पण नेता होऊ नकोस”, असा मजेशीर सल्लाही गडकरींनी १० वर्षीय आदित्यला दिला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
हनुमान बेनीवाल कोण आहेत?
हनुमान बेनीवाल हे राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे (RLP) संस्थापक आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागौर लोकसभा मतदारसंघातून एकहाती विजय मिळवला होता. बेनीवाल यांच्या पक्षानं भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. विशेष बाब म्हणजे राजस्थान विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. पण, त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला अनेक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, तसेच भाजपाच्या आमदार व खासदारांची प्रमुख उपस्थिती होती.
आणखी वाचा : Maharashtra Politics : कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड कोणाकडून? शिंदेंच्या १२ शिलेदारांची नावे दृष्टिपथात
राजकीय पक्षांबरोबर घनिष्ठ संबंध
बेनीवाल यांनी त्यांच्या बदलत्या राजकीय कारकिर्दीत विविध पक्षांमधील नेत्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. राजस्थानमधील शेतकऱ्यांचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. २००८ मध्ये बेनीवाल यांनी खिंवसर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. आमदारकीची पाच वर्षं पूर्ण केल्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. २०१३ मध्ये त्यांनी खिंवसरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीची स्थापना केली.
२०१९ मध्ये पहिल्यांदा खासदार
२०१९ मध्ये बेनीवाल यांनी भाजपाबरोबर युती केली आणि नागौर मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. मात्र, केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांना त्यांनी विरोध केला. त्यानंतर भाजपा आणि त्यांचे संबंध ताणले गेले. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. भाजपा उमेदवाराचा पराभव करून, ते सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले. दरम्यान, काही दिवसांपासून बेनीवाल यांनी काँग्रेसला विविध मुद्द्यांवरून लक्ष्य केलं आहे. त्यामुळेच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री त्यांच्याशी जवळीक वाढवत आहेत. २५ मार्च रोजी बेनीवाल यांचा मुलगा आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त याची प्रचिती आली आहे.
नितीन गडकरींचा बर्थडे बॉयला खास सल्ला
दरम्यान, हनुमान बेनीवाल यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला अनेक मोठे राजकीय नेते उपस्थित होते. त्यामध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, चिराग पासवान, जयंत चौधरी, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजप राज्यसभा खासदार रवनीत सिंग बिट्टू यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याशिवाय राजस्थान सरकारमधील मंत्री, तसेच काँग्रेस नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी बेनीवाल यांचा मुलगा आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “काहीही हो…; पण नेता होऊ नकोस”, असा मजेशीर सल्लाही त्यांनी आदित्यला दिला. त्यांच्या या सल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
हेही वाचा : Dara Shikoh : औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह कोण होता? आरएसएसकडून त्याची प्रशंसा कशासाठी?
हनुमान बेनीवाल यांना मोठी लोकप्रियता
स्पष्टवक्तेपणामुळे बेनीवाल यांना नागौर लोकसभा मतदारसंघात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. अलीकडेच लोकसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. जल जीवन मिशन योजनेत काँग्रेसच्या एका नेत्यानं मोठा भ्रष्टाचार केला, अशी टीका नाव न घेता त्यांनी अशोक गेहलोत यांच्यावर केली होती. भाजपाच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही बेनीवाल यांनी वारंवार लक्ष्य केलं आहे. गेल्या वर्षी भाजपाचे राजस्थान प्रभारी राधा मोहन दास यांनी हनुमान बेनीवाल यांना ‘उंदीर’, असं म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना, “दास असंच वागले, तर त्यांना राजस्थानमध्ये चपलानं मारहाण केली जाईल”, असं बेनीवाल यांनी म्हटलं होतं.
भाजपा आणि काँग्रेसवर अनेकदा आरोप
भाजपा आणि काँग्रेसचे नेते राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप बेनीवाल यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या दोन विश्वासू नेत्यांनी (उमेदा राम बेनीवाल व रेवंत राम डांगा) राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला सोडचिठ्ठी दिली होती. उमेदा राम बेनीवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक जिंकली. तर, रेवंत राम डांगा यांनी भाजपाची कास धरली आणि विधानसभेवर निवडून गेले आहेत. दरम्यान, पक्षातील दोन नेते निघून गेले तरी मला काही फरक पडत नाही. मी त्यांचा राजकीय बाप आहे, असा संतापही बेनीवाल यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.